लातूर : नीट २०२० परीक्षेत लातूरच्या राजर्षी शाहू महाविद्यालयाचा अभय अशोक चिल्लरगे ७०५ गुण मिळवून राज्यात दुसरा आला आहे. जेमतेम आर्थिक परिस्थिती असलेल्या अभयला ट्रक चालक असलेल्या त्याच्या वडिलांनी सदैव मोठ्या कॉलेजात शिक, असा मोलाचा संदेश दिला होता. तो सार्थ ठरवीत अभयने दिल्लीची वैद्यकीय शिक्षणातील सर्वोच्च एम्स संस्था गाठली आहे.
अतिशय सामान्य आर्थिक पार्श्वभूमी असलेल्या उदगीर येथील चिल्लरगे परिवारातील अभय सर्वात लहान मुलगा. एकूण चार भावंडे. शालेय जीवनापासूनच हुशार असलेल्या अभयने दहावीत ९६ टक्के गुण मिळवीत शिवछत्रपती शिक्षण संस्थेच्या शाहू महाविद्यालयात प्रवेश मिळविला. अकरावी विज्ञान वर्गाच्या सुरुवातीपासूनच त्याने कठोर परिश्रम केले.
कोरोनासमोर हार नाही... २०२० मध्ये शिक्षण घेणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांसमोर कोरोनानो विपरीत परिस्थिती निर्माण करून ठेवली. त्यात अभयही होता. तो म्हणाला, महाविद्यालयात सर्वच अभ्यास पूर्ण झाला होता. घरी बसून आॅनलाईन तासिका, सराव परीक्षा हे थोडे नवीन होते. परंतु, जिद्द आणि समोर ठेवलेले ध्येय यश मिळवून देते.
गुणवत्तेचा चढता आलेख... अभयच्या शिक्षणाचा गुणवत्ता आलेख चढता आहे. किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजनेत तो देशात ८८१ वा क्रमांक मिळवून यशस्वी झाला. तसेच अभियांत्रिकीसाठी घेण्यात आलेल्या जेईई मेन्समध्येही ९९.५० पर्सेंटाईल मिळविले होते. या आधारे त्याला देशातील कोणत्याही नामांकित एनआयटीमध्ये प्रवेश मिळू शकतो.
शिक्षण आणि संशोधन...अभय चिल्लरगे म्हणाला, आता पहिले ध्येय सर्वोच्च एम्स संस्थेत प्रवेश मिळविणे. मेंदू विकारतज्ज्ञ व्हायचे आहे. वैद्यकीय क्षेत्रात संशोधनाचाही मानस आहे. दरम्यान, अभयच्या यशाचे संस्थाध्यक्ष माजी खा.डॉ. गोपाळराव पाटील, सचिव प्राचार्य अनिरुद्ध जाधव यांनी कौतुक केले.