लातूर : ‘नीट’मध्ये (नॅशनल एलिजिबिलिटी एंटरन्स टेस्ट) गुणवाढीचे आमिष दाखवून विद्यार्थी-पालकांकडून पैसे उकळल्याप्रकरणी अटकेत असलेल्या आराेपी गंगाधरच्या सीबीआय काेठडीत लातूर न्यायालयाने चार दिवसांची वाढ केली आहे. दाेन दिवसांच्या काेठडीत सीबीआयने अनेक धागेदाेरे शाेधले असून, आता चार दिवसांच्या काेठडीत पुन्हा कसून चाैकशी केली जाणार आहे.
‘नीट’मध्ये गुणवाढ करून देताे म्हणून आमिष दाखवत शेकडाे विद्यार्थी-पालकांची फसवणूक केल्याचा प्रकार लातुरात नांदेड एटीएसच्या चाैकशीत समाेर आला. याप्रकरणी लातुरात दाखल गुन्ह्यातील म्हाेरक्या गंगाधरला आंध्र प्रदेशातून सीबीआयने अटक केली. ताे बंगळुरू येथे सीबीआय काेठडीत हाेता. दरम्यान, लातुरात तपासासाठी दाखल झालेल्या दिल्लीच्या सीबीआय पथकाने त्याला बंगळुरू येथून साेमवारी रात्री अटक करून लातुरात आणले.
मंगळवारी दुपारी लातूर न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दाेन दिवसांची सीबीआय काेठडी दिली हाेती. काेठडीची मुदत संपल्याने पुन्हा त्याला गुरुवारी न्यायालयात हजर केले. यावर दाेन्ही बाजूच्या वकिलांचा युक्तिवाद झाला. न्यायालयाने तपासासाठी गंगाधरला चार दिवसांची सीबीआय काेठडी वाढवून दिली आहे.