लातूर : ‘नीट’मध्ये (नॅशनल एलिजिबिलिटी एन्ट्रन्स टेस्ट) गुणवाढीचे आमिष दाखवून पालक-विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या म्हाेरक्या एन. गंगाधरसह चाैघांच्या घराची सीबीआयने झडती घेतली आहे. यामध्ये फसवणुकीसंदर्भातील काही पुरावे सीबीआयच्या हाती लागल्याची माहिती आहे. तिघांची चाैकशी केली असून, चाैथा इरण्णा काेनगलवार गुंगारा देत पसार आहे. अटकपर्व जामिनासाठी त्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली आहे.
लातुरातील दाखल गुन्ह्यात चाैघांच्या नावाचा समावेश आहे. यातील दाेघा शिक्षकांना लातुरातील अटक केली, तर म्हाेरक्या एन.गंगाधरला आंध्र प्रदेशातून उचलण्यात आले. या तिघांच्या चाैकशीत पसार असलेल्या इरण्णा काेनगलवारचा संदर्भ आला आहे. चाैघांचाही या गुन्ह्यात समावेश असल्याचे पुरावे नांदेड एटीएस आणि सीबीआयच्या हाती लागले. शिवाय, आतापर्यंत ८० वर पालक-विद्यार्थ्यांची यादी हाती लागली आहे. घरातून जप्त केलेली कागदपत्रे, इलेक्ट्राॅनिक्स साहित्य, बँक पासबुक, एटीएम कार्ड, सीम कार्डचा तपास करण्यात आला असून, अनेक पालकांची फसवणूक केल्याचे समाेर आले आहे.
तिघांच्या चाैकशीत सापडले समान धागे...सध्या न्यायालयीन काेठडीत असलेले दाेन शिक्षक आणि म्हाेरक्या गंगाधरची स्वतंत्रपणे सीबीआयने चाैकशी केली आहे. या तिघांच्या चाैकशीत समान धाग्याचा आणि पुराव्यांचा शाेध लागला आहे. या तिघांच्याही चाैकशीत इरण्णा काेनगलवारच्या सहभागाचे पुरावे सापडले असून, याच पुराव्याच्या आधारे सीबीआयला इरण्णाची चाैकशी करायची आहे. त्याच्या चाैकशीत आखणी नवीन माहिती समाेर येईल, असा विश्वास सीबीआयला आहे.
फसवणुकीचा ताळेबंद;माेठी आर्थिक उलाढालआराेपींचे माेबाइल, बॅक पासबुक जप्त केले असून, त्यांनी केलेल्या व्यवहाराची चाैकशी सुरू आहे. यात लाखाे रुपयांचा व्यवहार झाल्याचा संशय तपास यंत्रणांना असून, ताे ताळेबंद जुळविण्याचा प्रयत्न केला जात आहे.
८० पालक-विद्यार्थ्यांची यादी;‘सीबीआय’ नोंदविणार जबाबतिघा आराेपींच्या चाैकशीत आतापर्यंत ८० वर पालक-विद्यार्थ्यांची यादी समाेर आली असून, आता पालक-विद्यार्थ्यांना बाेलावून घेत जबाब नाेंदविले जात आहेत. यात परराज्यात जाऊन परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचा समावेश असून, आकडा वाढण्याचा संशय आहे.
सहा हजारांवर मेसेजचा उलगडा करण्याचा प्रयत्नम्हाेरक्या गंगाधरच्या माेबाइलमधून तब्बल सहा हजारांवर मेसेज करण्यात आले आहेत. शिवाय, अनेकांची नावे त्याने काेडवर्डमध्ये सेव्ह केली आहेत. याचा उलगडा करण्याचे काम सीबीआयकडून सुरू आहे. वापरण्यात आलेली सांकेतिक भाषा चक्रावून टाकणारी आहे. यातून महाराष्ट्रातील इतर एजंटांचा शाेध लागेल, असा संशय लातूर मुक्कामी तपास यंत्रणांना आहे.