लातूर : सीबीआयलाही गुंगारा देत इरण्णा काेनगलवार हा पसार आहे. त्याने आपल्याला अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून लातूर जिल्हा विशेष न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. दरम्यान, इरण्णा काेनगलवारचा या गुन्ह्यात सहभाग असून, त्याला तपासासाठी ताब्यात देण्यात यावे, अशी मागणी सीबीआय अधिकाऱ्यांनी लातूर न्यायालयात स्वत: हजर राहून केली. आता याबाबत १८ जुलैराेजी पुढील सुनावणी हाेणार आहे.
नांदेड एटीएसने केलेल्या प्राथमिक चाैकशीत, झाडाझडतीत नीटमध्ये गुणवाढीचे आमिष दाखवून अनेक पालक-विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याचे संदर्भ समाेर आले. याबाबत लातूर येथे शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात २३ जून राेजी रात्री चाैघांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, यातील दाेघांना पाेलिसांनी तातडीने अटक केली. शिवाय, म्हाेरक्या गंगाधरला सीबीआयने आंध्र प्रदेशातून अटक केली. सध्या या गुन्ह्याचा तपास दिल्लीच्या सीबीआय पथकाकडून केला जात आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून इरण्णा काेनगलवार स्थानिक पाेलिस पथक, सीबीआयला चकवा देत पसार आहे. त्याच्या शाेधासाठी तपास यंत्रणा मागावर आहेत, मात्र ताे सापडत नाही. अटकपूर्व जामिनासाठी लातूर न्यायालयात त्याने अर्ज केला असून, सीबीआयने स्वत: न्यायालयात हजर हाेत त्याला ताब्यात देण्याची मागणी केली आहे.