लातूर : ‘नीट’मध्ये गुणवाढीचे आमिष दाखवत विद्यार्थी-पालकांची फसवणूक केल्याप्रकरणी लातुरातील गुन्ह्यात उत्तर भारतातील गंगाधर आणि दक्षिण भारतातील गंगाधरची नावे समाेर आली. दरम्यान, महाराष्ट्रातील भानगडीचा म्हाेरक्या दक्षिणेतील एन. गंगाधरअप्पाच असल्याचे समाेर आले. त्याच्या माेबाईलमधील सहा हजार मेसेज, ‘काेडवर्ड’चा उलगडा हाेत नसल्याने गुढ वाढले आहे.
‘नीट’मध्ये (नॅशनल एलिजिबिलिटी एंटरन्स टेस्ट) गुणवाढीचे आमिष दाखवून पालक-विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी लातुरात शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात २३ जून राेजी नांदेड एटीएसच्या तक्रारीनंतर चाैघांविरुद्ध गुन्हा दाखल केला हाेता. यातील दाेघा शिक्षकांना पाेलिसांनी अटक करुन चाैकशी केली आहे. त्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग झाले. लातूर पाेलिसांकडून आराेपींचा ताबा सीबीआयने घेत त्यांचीही कसून चाैकशी केली आहे.
लातुरात दिल्लीच्या गंगाधरची दप्तरी नाेंद...
लातुरातील एफआयआरमध्ये नाेंद असलेल्या गंगाधर नामक व्यक्तीला सीबीआयने २६ जून राेजी उत्तराखंडमधून ताब्यात घेतले हाेते. त्याचीही चाैकशी केली असून, लातुरातील आराेपींचा व दिल्लीतील गंगाधरचा संपर्क नेमक्या काेणत्या कारणामुळे झाला? याचाही शाेध सीबीआयकडून घेतला जात आहे.
दाेन्ही गंगाधरबाबत निर्माण केला संभ्रम...
चाैकशीत प्रारंभी आराेपींनी दिशाभूल करत उत्तर आणि दक्षिणेतील गंगाधरबाबत संभ्रम निर्माण केला असावा, असा संशय आहे. दाेन्ही गंगाधारचा महाराष्ट्रातील भानगडीशी संबंध काय? याचाही शाेध घेतला जात आहे. तर इरण्णा काेनगलवार याने लातूर जिल्हा विशेष न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असून, त्यावर आज गुरुवारी सुनावणी हाेत आहे.
आंध्रातील गंगाधरचे लातुरात लाेकेशन ट्रेस...
संजय जाधव याच्या माेबाईलमधून आंध्रातील एन. गंगाधरअप्पाचे ‘लाेकेशन ट्रेस’ झाले. आंध्रातून अटक करण्यात आली. सीबीआयने बंगळरु येथून त्याला लातुरात आणले. सहा दिवस सीबीआय काेठडीत चाैकशी केली. मात्र, वारंवार आजारी पडणाऱ्या गंगाधरला न्यायालयीन काेठडीत पाठवावे, अशी विनंती सीबीआयने लातूर न्यायालयाला केली. १९ जुलैपर्यंत काेठडीत रवानगी केली.
इरण्णाची चौकशी; मिळतील धागेदाेरे?
इरण्णा काेनगलवारच्या चाैकशीवरच सीबीआयचा ‘फाेकस’ असून, आतापर्यंत चाैघांपैकी तिघांची चाैकशी केली आहे. मात्र, इरण्णा तपास यंत्रणांना गुंगारा देत पसार आहे. त्याला ताब्यात घेत सीबीआयला चाैकशी करायची आहे. या चाैकशीत अनेक धागेदाेर समाेर येतील. शिवाय, तपासाचे वर्तुळही पूर्ण हाेईल, असा विश्वास सीबीआयला आहे.
जप्त मोबाईलची लॅबमध्ये तपासणी...
नांदेड एटीएस, लातूर पाेलिस आणि दिल्लीतील सीबीआयने जप्त केलेल्या आराेपींचे माेबाईल फॉरेन्सिक लॅबकडे तपासणीसाठी पाठविले आहेत. लॅबचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तपासाला गती मिळणार असून, अनेक खुलासे, धागेदाेरे सीबीआयच्या हाती लागतील, असे सूत्रांनी सांगितले.