लातूर : ‘नीट’मध्ये गुणवाढीचे आमिष दाखवून पालक-विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी लातुरात दाखल गुन्ह्यातील इरण्णा काेनगलवारचा शनिवारी लातूर जिल्हा विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एस. टी. त्रिपाठी यांनी अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. चाैघा आराेपींपैकी तिघांची आतापर्यंत सीबीआयने चाैकशी केली आहे. पसार झालेल्या इरण्णाची चाैकशी करायची असून, ताबा महत्त्वाचा आहे. असा युक्तिवाद सीबीआयच्या वतीने शुक्रवारी न्यायालयात करण्यात आला हाेता. दरम्यान, शनिवारी अटकपूर्व जामिनावर न्यायालयाने निर्णय दिला. गुंगारा देणाऱ्या इरण्णाचा सीबीआयने फास आवळला आहे.
‘नीट’मध्ये गुण वाढवून देताे. कमी गुण असले तरी एमबीबीएसला प्रवेश मिळवून देताे, असे पालक-विद्यार्थ्यांना आमिष दाखवून १५ लाखांची बाेलणी केली. अडव्हाॅन्स म्हणून काही रक्कम उकळली. नांदेड एटीएसच्या हाती लागलेल्या धागेदाेऱ्यानंतर लातूर येथे शिवाजीनगर ठाण्यात २३ जूनराेजी चाैघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. यातील शिक्षक संजय जाधव, जलीलखाँ पठाण, एन गंगाधरला अटक करुन चाैकशी करण्यात आली. सध्या ते न्यायालयीन काेठडीत आहेत.
इरण्णाच्या अटकेसाठी सीबीआय पथक मागावरगुन्हा दाखल झाल्यापासून इरण्णा काेनगलवार हा एटीएस, स्थानिक पाेलिस आणि सीबीआयलाही गुंगारा देत पसार झाला. त्याच्या अटकेसाठी तपास यंत्रणांची पथके मागावर आहेत. दरम्यान, लातूर न्यायालयात इरण्णा काेनगलवारने वकील ए. पी. ताेतला यांच्या मार्फत अटकपूर्व जामीन मिळावा, यासाठी अर्ज दाखल केला हाेता. सुनावणीअंती लातूर येथील विशेष न्यायालयाने शनिवारी त्याचा जामीन फेटाळला आहे. आता इरण्णाच्या अटकेसाठी सीबीआयने फास आवळला आहे.
‘सीबीआय’ म्हणाले, गुन्ह्यात चाैघांचा सहभागलातुरातील गुन्ह्यात चाैघांचा सहभाग असल्याचे पुरावे हाती लागले आहेत. शिवाय, म्हाेरक्या एन. गंगाधरच्या चाैकशीत इरण्णा काेनगलवार, संजय जाधव आणि जलीलखाँ पठाण यांच्याशी झालेला संवाद, पैशाचा व्यवहार, विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे आढळली आहेत. या चाैकशीतील महत्त्वाचा भाग इरण्णा काेनगलवार आहे. ताे पूर्वीपासूनच एन.गंगाधरच्या संपर्कात असून, त्याचा ताबा अन् चाैकशी तपासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे, असे सीबीआयने न्यायालयाला सांगितले.
गंगाधर-इरण्णामध्ये तेलगू भाषेत संवाद !लातुरातील शिक्षकांना मराठी भाषा येते. एन. गंगाधरला तेलगू भाषा येते. तर इरण्णा काेनगलवारलाही तेलगू येते. गंगाधर आणि इरण्णामध्ये वारंवार तेलगू भाषेतून संवाद झाला आहे. शिवाय, नीटमध्ये गुणवाढीसंदर्भात आर्थिक व्यवहाराची बाेलणी. अडव्हान्स म्हणून पैशाचा व्यवहार झाल्याचेही पुरावे सीबीआयच्या हाती लागले आहेत. इरण्णाचा या गुन्ह्यात महत्त्वाचा सहभाग असल्याचे तपास यंत्रणांनी सांगितले.
दाेघा शिक्षकांचा जामिनासाठी अर्जलातुरातील गुन्ह्यात न्यायालयीन काेठडीत असलेले शिक्षक संजय जाधव, जलीलखाँ पठाण यांनी आपल्या वकिलामार्फत लातूर न्यायालयात जामिनसाठी अर्ज दाखल केला आहे. आता त्यावर न्यायालयात सुनावणी हाेणार असून, सीबीआयच्या वतीने वकील मंगेश महिंद्रकर हे बाजू मांडणार आहेत.