लातूर : ‘नीट’मध्ये गुणवाढीचे आमिष दाखवून पालक-विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी न्यायालयीन काेठडीत असलेला संजय जाधव, जलीलखाॅ पठाणचा जामीन लातूर न्यायालयाने शुक्रवारी दुपारी फेटाळला. याबाबत न्यायाधीश एम.एन. चव्हाण यांनी निर्णय दिला आहे.
‘नीट’मध्ये गुणवाढीचे आमिष दाखवून पालक-विद्यार्थ्यांकडून लाखाे रुपये उकळल्याप्रकरणी लातुरातील शिवाजीनगर पाेलीस ठाण्यात २३ जून राेजी चाैघांविराेधात गुन्हा दाखल केला हाेता. दरम्यान, संजय जाधव, जलीलखाॅ पठाणला पाेलिसांनी अटक केली. म्हाेरक्या एन.गंगाधरअप्पाला आंध्रातून सीबीआयने अटक केली. सीबीआय काेठडी संपल्यानंतर तिघांची न्यायालयीन काेठडीत रवानगी झाली. यातील संजय जाधव, जलीलखाॅ पठाणच्या वकिलांनी गुरुवार, १८ जुलै राेजी लातूर न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला हाेता. सीबीआयने आठ दिवसांचा वेळ मागितला. गुरुवार, २५ जुलै राेजी लेखी पत्राद्वारे त्यांनी न्यायालयात भूमिका मांडली. जामिनावर आराेपींकडून ॲड. बळवंत जाधव, ॲड. चंद्रकांत मेटे तर सीबीआयकडून ॲड. मंगेश महिंद्रकर यांनी युक्तिवाद केला. सुनावणीअंती न्यायाधीश एम.एन. चव्हाण यांनी जाधव, पठाणचा जामीन फेटाळला आहे.
पुरावे नष्ट करतील;‘सीबीआय’ला भीती...न्यायालयीन काेठडीतील आराेपी संजय जाधव, जलीलखाॅ पठाणला जामीन दिला तर ते आणि पसार झालेला इरण्णा काेनगलवार संगनमत करुन पुरावे नष्ट करतील, अशी भीती सीबीआयला आहे. या दाेघांचाही जामीन मंजूर करु नये, अशी विनंती लातूर न्यायालयाला सीबीआयच्या वतीने करण्यात आली आहे.
इरण्णा हाती लागत नाही, ताेपर्यंत जामीन देऊ नये...लातुरातील गुन्ह्याच्या तपासात चाैथा आराेपी इरण्णा काेनगलवारची अटक महत्त्वाची आहे. महिनाभरापासून ताे गुंगारा देत पसार आहे. जाेपर्यंत त्याला अटक हाेणार नाही, चाैकशीअंती तपास पूर्ण हाेणार नाही, ताेपर्यंत न्यायालयीन काेठडीतील आराेपींचा जामीन मंजूर करु नये, असा युक्तिवाद सीबीआयने न्यायालयात केला.
सग्यासाेयऱ्यांनीही बंद केले ‘इरण्णा’साठी दार !महिनाभरापासून नांदेड एटीएस, लातूर पाेलीस आणि दिल्ली सीबीआयला चकवा देत पसार झालेल्या इरण्णा काेनगलवारचा शाेध नजीकच्या नातेवाईकांकडे घेतला जात आहे. संपर्कातील नातेवाईकांच्या दारावरही तपास यंत्रणांनी धडका दिल्या आहेत. याच धास्तीतून आता सग्यासाेयऱ्यांनीही घराचे दार त्याच्यासाठी बंद केल्याची माहिती समाेर आली आहे.