लातूर : ‘नीट’मध्ये गुणवाढीचे आमिष दाखवत महाराष्ट्रातील पालकांची फसवणूक केली असून, त्यात आंध्र प्रदेश, तेलंगणातील ‘मास्टर माईंड’ला अटक केली आहे. सीबीआयने एन. गंगाधरला आंध्र प्रदेशातून तर मुंबईतून पळालेल्या अरविंद (हैदराबाद) याला बेळगाव पाेलिसांनी अटक केली. दाेघांचीही कसून चाैकशी सुरू असून, लातुरात मुक्कामी असलेल्या सीबीआयला दाेघांच्या संबंधावर संशय आहे.
लातुरातील गुन्ह्यात संजय जाधव, जलीलखाॅ पठाण व इरण्णा काेनगलवारच्या माध्यमातून ‘नीट’मध्ये गुणवाढीचे आमिष दाखवून पालक-विद्यार्थ्यांकडून पैसे उकळल्याचे पुरावे सीबीआयच्या हाती लागले आहेत. याप्रकरणी गंगाधरची सीबीआयकडून चाैकशी करण्यात आली असून, सहा दिवसांच्या काेठडीत त्याने प्रतिसाद दिला नाही. एफआयआरमध्ये गंगाधरचा पत्ता दिल्ली असा हाेता. ताे मूळचा आंध्र प्रदेशातील हिंदूपूरम् येथील असल्याचे समाेर आले. गंगाधरचे आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, कर्नाटक आणि महाराष्ट्रात नेटवर्क असल्याचे समाेर येत आहे.
गंगाधर-अरविंदचे महाराष्ट्रात ‘नेटवर्क’
तेलंगणातील अरगाेंड अरविंद ऊर्फ अरुणकुमार (वय ४७, रा. इंदिरानगर, गच्ची बाेळी, ह.मु. काेंडकल्ल-शंकरपल्ली जि. संगारेड्डी) याने साकीनाका (मुंबई) येथे काैन्सिलिंग करियर अकादमीची स्थापना करून ‘नीट’मध्ये गुणवाढीचे आमिष दाखवत काेट्यवधींची फसवणूक केली. बेळगावातील मार्केट ठाण्याच्या पाेलिसांनी त्याला साेमवारी ताब्यात घेतले. त्याच्याकडून १२ लाख, १५ संगणक, ५ माेबाईल, लॅपटाॅप जप्त केले आहेत.
दाेघा गुन्हेगारांची गंडा घालण्याची पद्धत एक...
महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत एजंट म्हणून नेमायचे अन् पालकांना गळाला लावायचे, असा फंडा आंध्र प्रदेशातील गंगाधर आणि तेलंगणातील अरविंदने वापरला आहे. दाेघांनीही ‘नीट’मध्ये पालकांना गुणवाढीचे आमिष दाखविल्याचे तपासात समाेर आले आहे. त्यांनी महाराष्ट्रात चांगलेच ‘बस्तान’ बसविले आहे.
गंगाधर-अरविंदवर विविध राज्यांत गुन्हे...
एन. गंगाधर, अरविंदविरुद्ध महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, तेलंगणा राज्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती समाेर आली असून, बहुतांश गुन्हे फसवणुकीचे आहेत. तपास सीबीआय, स्थानिक यंत्रणांकडून केला जात आहे. या दाेघांचा किमान पाच ते सहा राज्यांत वावर असल्याचा संशय आहे.
इरण्णाच्या चौकशीत ‘नेटवर्क’ची उकल...
लातुरात गुन्हा दाखल झाल्यापासून इरण्णा काेनगलवार हा सीबीआयलाही गुंगारा देत पसार आहे. अटकेसाठी विविध पथके मागावर आहेत. त्यांच्या चाैकशीत महाराष्ट्रातील ‘नेटवर्क’ची उकल हाेणार आहे. आतापर्यंत गुन्ह्यातील तिघांची चाैकशी करण्यात आली असून, आता सीबीआयला इरण्णाचा ताबा हवा आहे.