लातूर : ‘नीट’मध्ये (नॅशनल एलिजिबिलिटी एन्ट्रन्स टेस्ट) गुणवाढीचे आमिष दाखवून पालक-विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी आंध्र प्रदेशातून उचलण्यात आलेला म्हाेरक्या एन. गंगाधर अप्पाच्या माेबाइलमध्ये सेव्ह असलेल्या ‘काेडवर्ड’ मधील एका-एका नावाचे सीबीआयकडून सध्या ‘ट्रेसिंग’ सुरू आहे. शिवाय, सहा हजार मेसेजचा संदर्भ शाेधला जात असून, तपास यंत्रणांनाही चक्रावून टाकणाऱ्या सांकेतिक भाषेची उकल करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, संजय जाधव, जलीलखाॅ पठाण याच्या जामीनावर आज शुक्रवारी लातूर न्यायालयात सुनावणी झाली.
‘नीट’ गुण वाढीचे आमिष दाखवून पालक-विद्यार्थ्यांकडून टाेकन म्हणून ५० हजार उकळण्यात आले. गुणवाढीचे काम झाल्यावर ५ ते १५ लाख रुपये देण्याचे ठरले हाेते. मात्र, त्यापूर्वीच नांदेड एटीएसच्या चाैकशीत या प्रकरणाचे बिंग फुटले. शिक्षक संजय जाधव, जलीलखाॅ पठाणच्या चाैकशीत बिहार, कर्नाटक राज्यातील परीक्षा केंद्रांवरील प्रवेशपत्रे आढळली. तर ॲडव्हान्स म्हणून पालकाकडून प्रति ५० हजार घेतल्याची कबुली दिली. हाच धागा पकडून नांदेड एटीएस, लातूर पाेलिस आणि आता सीबीआय तपास करत आहे. तर चाैथा साथीदार इरण्णा काेनगलवारच्या अटकेसाठी सीबीआयकडून प्रयत्न सुरू आहेत.
जामिनावर देता येणार नाही; सीबीआयचे लेखी पत्र सादर...न्यायालयीन काेठडीत असलेले संजय जाधव, जलीलखाॅ पठाणच्या जामिनावर गुरुवारी सीबीआयने आपली भूमिका लेखी पत्राद्वारे लातूर न्यायालयात सादर केली. या आराेपींना जामीन देता येणार नाही. चाैथा इरण्णा काेनगलवार हा अद्याप पसार आहे. इरण्णाच्या चाैकशीत अनेक खुलासे, संदर्भ हाती लागतील. त्याची चाैकशी महत्त्वाची आहे. असेही म्हटले आहे. आता यावर शुक्रवारी सुनावणी झली.
जामिनासाठी खंडपीठात दाखल करणार याचिका...महिनाभरापासून एटीएस, लातूर पाेलिस आणि सीबीआय़च्या पथकांना गुंगारा देत पसार असलेल्या इरण्णा मष्णाजी काेनगलवार (रा. नाटकर गल्ली, देगलूर, जि. नांदेड) याचा अटकपूर्व जामीन लातूर येथील विशेष न्यायालयाने फेटाळला असून, याला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले जाणार आहे. दाेन दिवसांत याचिका दाखल केली जाणार आहे, असे वकील प्रवीण ताेतला म्हणाले.