राजकुमार जाेंधळे / लातूर : ‘नीट’मध्ये गुणवाढीचे आमिष दाखवत शेकडाे पालकांना आपल्या एजंटाच्या बळावर गंडविणाऱ्या म्हाेरक्याला सीबीआयने चांगलेच कचाट्यात घेतले आहे. दाेन दिवसाच्या काेठडीत त्याच्या जप्त माेबाईलमधून तब्बल ६ हजार मेसेज केल्याचा संदर्भ आढळला आहे. हे मेसेज काेणाला केले? याचा शाेध सीबीआयकडून घेतला जात आहे. राज्यातील शेकडाे पालक-विद्यार्थ्यांकडून लाखाे रुपये उकळल्याचा प्रकार आता समाेर येत आहे.
आंध्र प्रदेशातील हिंदूपुरम जि. सत्यसाई (पिनकाेड - ५१५२०१) असा मूळचा पत्ता असलेल्या एन. गंगाधरअप्पा नंजुडअप्पा महाराष्ट्रातील किती जिल्ह्यातील एजंटाच्या संपर्कात आला? याचा धागा सीबीआयकडून उकलला जात आहे. लातुरातील शिक्षक संजय जाधव याच्या संपर्कात ताे असल्याची माहिती ‘माेबाईल डेटा’मधून उघड झाली. सात लाखांचा व्यवहार झाल्याचे पुरावे सीबीआयला मिळाले आहेत. शिवाय, इतर माध्यमातून माेठ्या प्रमाणावर उलाढाल झाल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. याबाबतची माहिती दिल्ली येथील सीबीआय अधिकारी कुणाल अराेरा यांनी लातूर न्यायालयात दिली.
मोबाईलमध्ये सेव्ह केली अनेकांची कोडवर्ड नावे...
लातुरात मुक्कामी असलेल्या सीबीआयने म्हाेरक्या गंगाधरचा माेबाईल जप्त केला असून, त्याच्या माेबाईलमध्ये शेकडाे नावे काेडवर्ड पद्धतीने सेव्ह केल्याचे लातूर न्यायालयात सांगण्यात आले. आता या काेडवर्डची उकल करणे आणि ती नावे काेणा-काेणा एजंटाची आहेत, याचा शाेध सीबीआय काेठडीत घेतला जाणार आहे. यातून या प्रकरणाची व्याप्ती समाेर येईल.
'मेसेज अन् कोडवर्ड'ची उकल करणे सीबीआयसमोर आव्हान...
माेबाईलमध्ये सेव्ह असलेली काेडवर्ड पद्धतीची नावे आणि केलेले तब्बल सहा हजार मेसेजबाबत सीबीआयने दाेन दिवसांच्या काेठडीत कसून चाैकशी केली आहे. मात्र, यावर त्याने ताेंड उघडले नाही. आता हे मेसेज आणि काेडवर्ड नावांचा शाेध लावणे, अर्थ जुळवणे हेच सीबीआयसमाेर आव्हान आहे. यातून अनेक धक्कादायक प्रकार, खुलासे समाेर येणार आहेत.
सांकेतिक भाषेचा वापर; अनेकांना लावले गळाला...
आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील एजंटाच्या माध्यमातून गंगाधरने अनेक पालकांना गुणवाढीचे आमिष दाखवून गळाला लावल्याचे समाेर आले आहे. यासाठी त्याने सांकेतिक भाषेचा वापर केला असून, ही भाषा, त्यातील खाणा-खुणा गंगाधरलाच माहिती आहेत. अतिशय चाणाक्षपणे त्याने हे व्यवहार करुन एजंटांशी संपर्क साधला आहे.