लातूर : एनटीएच्या (नॅशनल टेस्टिंग एजन्सी) वतीने घेण्यात आलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणात लातुरातील दोन जिल्हा परिषद शिक्षक, तसेच नांदेड व दिल्लीतील प्रत्येकी एका आरोपीविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात रविवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
नीटच्या निकालानंतर देशभर गोंधळाचे वातावरण असून, बिहार, पंजाब, गुजरात व हरियाणा राज्यातील पेपरफुटी प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणा सक्रिय झाली आहे. महाराष्ट्रातही दहशतवाद विरोधी पथकाच्या साह्याने माहितीची पडताळणी करणे सुरू आहे. दरम्यान, शनिवारी दोन जिल्हा परिषद शिक्षकांना चौकशीसाठी बोलावून नंतर सोडून देण्यात आले. मात्र तपास यंत्रणांच्या हाती आलेल्या माहितीनुसार आरोपींच्या मोबाइलवरती हॉलतिकीट व काही आर्थिक व्यवहारांचे संदर्भ आढळून आल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. त्या माहितीच्या आधारे दोन्ही शिक्षक, तसेच नांदेड व दिल्ली येथील आणखी दोघे, अशा चौघांविरुद्ध रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल होईल, असे सांगण्यात आले. पेपरफुटीच्या प्रकरणात दहशतवाद विरोधी पथकाच्या तक्रारीवरून लातूर पोलिस आरोपींविरुद्ध केंद्राने केलेल्या पेपरफुटीच्या नव्या कायद्यानुसार गुन्हा दाखल करणार आहेत.
प्रश्न विचारले सोडून दिलेज्या दोन शिक्षकांवर आरोप आहेत, त्यातील एकाने व्हिडिओद्वारे स्पष्टीकरण दिले. पथक आमच्याकडे आले. पोलिस अधीक्षक कार्यालयात नेऊन आमची चौकशी केली. काही प्रश्न विचारले. त्यानंतर आम्हाला घरी सोडून दिले, असल्याचे सांगितले. दरम्यान, रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने अनेक प्रश्नांची उत्तरे तपासात पुढे येणार आहेत.
२३ लाख विद्यार्थ्यांचा जीव टांगणीलादेशभरात २३ लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी नीट परीक्षा दिली आहे. निकाल लागूनही विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. प्रामाणिकपणे अभ्यास करून गुणवत्ता मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांनाही आनंद साजरा करता आला नाही. त्यातच पेपरफुटीच्या तपासात नवनवीन खुलासे होत असल्याने विद्यार्थी, पालकांत संभ्रम आहे.