लातूर : ‘नीट’मध्ये (नॅशनल एलिजिबिलिटी एंटरन्स टेस्ट) गुणवाढीचे आमिष दाखवून विद्यार्थी-पालकांकडून पैसे उकळल्याप्रकरणी सीबीआय काेठडीत असलेला म्हाेरक्या गंगाधरची दिवसभर चाैकशी केली जात आहे. झालेल्या व्यवहाराचा ताळेबंद मात्र जुळता जुळत नसल्याचे समाेर आले आहे. रेकार्डनुसार सात लाखांवर व्यवहार झाल्याचे समाेर आले आहे. मात्र, यात लाखाे रुपयांची उलाढाल झाल्याचा संशय सीबीआयला आहे.
आंध्र प्रदेशातील हिंदूपुरम (जि. सत्यसाई) येथील मुळचा असलेल्या एन. गंगाधरअप्पा नंजुडअप्पा याने आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात एजंटाची नेमणूक केली असून, त्या माध्यमातून शेकडाे पालकांना गळाला लावले. गुण वाढीचे आमिष दाखवून विविध राज्यातील एजंटांनी लाखाे रुपये उकळल्याचे चाैकशीत समाेर आले. लातुरातील आराेपीसाेबत सात लाखांचा व्यवहार झाल्याचे उघड झाले. गत चार दिवसांपासून सीबीआयने बॅक व्यवहार व इतर संशयास्पद व्यवहाराचा ‘ताळमेळ’ घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, अद्याप या व्यवहाराचा ताळेबंद जुळता जुळत नसल्याचे समाेर आले आहे. आराेपींनी माेठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार केल्याचा संशय सीबीआयच्या अधिकाऱ्यांना आहे.
हिसका दाखविला की वाढताे बीपी; २०२२ मध्ये झाली ह्रदय शस्त्रक्रिया...
सीबीआय काेठडीतील गंगाधरला हिसका दाखविला की, बीपी वाढत आहे. अचानक बीपी वाढल्याने त्याला लातुरातील शासकीय रुग्णालयात दाेनदा उपचारासाठी दाखल करावे लागले. २०२२ मध्ये त्याची हृदय शस्त्रक्रिया झाल्याचे त्याच्या वकिलाने न्यायालयात सांगितले.
गुणवाढीसाठी पैसे देणारे 'कायद्या'च्या कचाट्यात..?
मुलाची पात्रता नसताना एजंटाच्या माध्यमातून पैसे देणाऱ्या पालकांचा पाेलिस, सीबीआयकडून जबाब नाेंदविला जात आहेत. पैसे देणाऱ्या पालक-विद्यार्थ्यांची यादी ३२ वर पाेहचली. यात पैसे देणारे अन् घेणारे दाेघेही दाेषी असून, त्यांना शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी आराेपीच्या वकिलाने न्यायालयाकडे केली.
लातुरातील पाणी पचेना; कोठडीत प्रतिसाद देईना...
बंगळरु येथून ६ जुलैराेजी गंगाधरला लातुरातील सीबीआयने ताब्यात घेतले. दरम्यान, त्याला ८ जुलैराेजी रात्री लातुरात आणण्यात आले. मंगळवारी न्यायालयात हजर केले. दाेन दिवसाची काेठडी मिळाली. मात्र, गंगाधरची प्रकृती बिघडली. काेठडीत गंगाधरला ‘लातूरचे पाणी’ पचत नसल्याने ताे चाैकशीला प्रतिसाद देत नाही.
गंगाधर-इरण्णाची समोरासमोर चौकशी...
नीट प्रकरणात पसार झालेला इरण्णा काेनगलवार अद्याप सीबीआयच्या हाती लागला नाही. यातील दाेघा शिक्षकांची चाैकशी केली असून, गंगाधारची चाैकशी सुरु आहे. मात्र, मध्यस्थ म्हणून समाेर आलेल्या इरण्णा व म्हाेरक्या गंगाधारची समाेरासमाेर चाैकशी केली जाणार आहे. त्याला ताब्यात घेण्यासाठी सीबीआयने स्वत: लातूर न्यायालयात अर्ज केला आहे.