लातूर : चिंचोलीराववाडी परिसरात असलेले गोदाम फोडून तुरी २६ कट्टे पळविल्याची घटना घडली. याबाबत एमआयडीसी ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. यातील पाच आरोपीच्या मुसक्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी आवळल्या आहेत. त्यांच्याकडून वाहनांसह ७ लाख ५६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. विशेष म्हणजे चोरट्यांनी रेकीकरून बनावट चावीच्या सहाय्याने ही चोरी केल्याचे पुढे आले आहे.
या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे, एमआयडीसी ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या पथकाने चोरट्यांचा शोध सुरु केला होता. दरम्यान, खबऱ्याने दिलेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुन्ह्यातील संशयित आरोपी योगेश कृष्णा मोरे (वय २१ रा. स्वराज्य नगर वसवाडी, लातूर), विवेक अशोक हनमंते (वय २२, रा. खडक हनुमान, लातूर), तानाजी गोरोबा आतकरे (वय २० रा. स्वराज नगर, वसवाडी, लातूर), आकाश उर्फ सुरज पंडितराव लोमटे (वय २४ रा. स्वराज्य नगर वसवाडी, लातूर), आकाश भालचंद्र सुरवसे (वय २३, रा. खडक हनुमान, लातूर) यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सखोल विचारपूस केली असता त्यांनी या गोदामची बनावट चावी बनवून गोदामामध्ये साठवलेल्या धान्यापैकी तुरीचे प्रत्येकी ५० किलो वजनाचे २६ कट्टे त्याच्या चारचाकी आणि दुचाकी वाहनावरून चोरून नेल्याचे कबूल केले आहे.
शिवाय, वरील आरोपीपैकी आकाश लोमटे याच्या घरी ठेवलेले गोदामातील चोरलेले २६ तुरीचे कट्टे, गुन्ह्यात वापरलेले एक स्विफ्ट डिझायर कार, दोन मोटरसायकल असा एकूण ७ लाख ५६ हजार ४०० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटकेतील आरोपींना एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक डाके करत आहेत. ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन द्रोणाचार्य, सहाय्यक फौजदार संजय भोसले, सुधीर कोळसुरे राम गवारे, योगेश गायकवाड, सिद्धेश्वर जाधव, नाना भोंग, प्रदीप चोपणे यांच्या पथकाने केली आहे.