राजकुमार जाेंधळे / लातूर : ‘नीट’मध्ये (नॅशनल एलिजिबिलिटी एंटरन्स टेस्ट) गुणवाढीचे आमिष दाखवून फसवणूक केलेल्या विद्यार्थी-पालकांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्रातील लातूर, बीड, छत्रपती संभाजीनगर, नांदेडसह इतर जिल्ह्यातही गंगाधारचे अनेक एजंट कार्यरत असल्याची माहिती सीबीआय चाैकशीत समाेर आली आहे.
गुणवाढीच्या रॅकेटचा म्हाेरक्या एन. गंगाधरअप्पा लातुरात सध्या सीबीआय काेठडीत असून, कसून चाैकशी सुरू आहे. जप्त माेबाइलमधील सहा हजार मेसेजचा उलगडा केला जात आहे. ‘काेडवर्ड’मध्ये महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातील एजंटांची नावे दडल्याचे समाेर आले आहे. लातूर, बीडपाठाेपाठ आता छत्रपती संभाजीनगर, नांदेडसह इतर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची यादी समाेर आली आहे. गुणवाढीच्या आमिषाला बळी पडलेल्यांची विद्यार्थी-पालकांची संख्या ८० वर पाेहोचली असून, आता हा आकडा वाढण्याचा तपास यंत्रणांना अंदाज आहे.
गंगाधरची रोज आराेग्य तपासणी...
गंगाधरचा बीपी वाढत असून, राेज आराेग्य तपासणी केली जात आहे. प्रकृती स्थिर झाली की, मग चाैकशी केली जात आहे. सहा हजार मेसेजचा संदर्भ जुळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. चाैकशीत लातूरसह महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात असलेल्या एजंटांचा सीबीआयला शाेध लागला असून, हा आकडा माेठा असल्याचा संशय आहे. गंगाधरची प्रकृती साथ देत नसल्याने चाैकशीत अडथळा येत आहे.
डिलिट केला मेसेज; संशय बळावला..?
म्हाेरक्या गंगाधर, संजय जाधव याच्या माेबाइलमध्ये काही मेसेज, डेटा डिलिट केल्याने सीबीआयचा संशय बळावला असून, या डिलिट मेसेजमध्ये नेमके काय हाेते? याचाही तपास केला जात आहे. माेबाईलमधील माहिती चक्रावून टाकणारी आहे. अनेकांची नावे ‘काेडवर्ड’मध्ये सेव्ह केल्याने प्रकरणाचा गुंता अधिक वाढला आहे.
चार आराेपींची हाेणार समोरासमोर चौकशी...
या प्रकरणात चाैघांची सीबीआय समाेरासमाेर चाैकशी करणार आहे. त्यासाठी गुंगारा देणाऱ्या इरण्णा काेनगलवारच्या अटकेसाठी प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत तिघांना अटक केली असून, चाैथा मात्र अद्याप हाती लागला नाही. त्याच्याही लवकरच मुसक्या आवाळल्या जातील, असा विश्वास सूत्रांनी व्यक्त केला आहे.
इरण्णाचा चार जिल्ह्यांत वावर?
इरण्णा काेनगलवारचा लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी जिल्ह्यात वावर असल्याचा संशय सीबीआयला आहे. ताे हाती लागला तरच या प्रकरणाचे धागेदाेरे अधिक उलगडतील. गंगाधर हा म्हाेरक्या असला तरी महाराष्ट्रात मध्यस्थ म्हणून काम करणारे एजंट मात्र दुसरेच असल्याचे समाेर येत आहे.