लातूर : गत पावसाळ्यात अल्प पर्जन्यमान झाले असले तरी रबी हंगामातील पिकांचा वाढला आहे. सध्या हरभरा वाढीच्या अवस्थेत असून वातावरणातील बदलामुळे मर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. तसेच काही ठिकाणच्या ज्वारीवर लष्करी अळी दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे नवे संकट निर्माण झाले असून रोगाच्या नियंत्रणासाठी विविध औषधांची फवारणी करीत असल्याचे दिसून येत आहे.
गत आठवड्यापासून वातावरणात पुन्हा बदल झाला आहे. हवेत गारवा वाढल्याने थंडी अधिक जाणवत आहे. वातावरणातील बदलाचा रबी हंगामातील पिकांवर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. गत पावसाळ्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यातील नदी- नाले वाहिले नाहीत. त्याचबरोबर मध्यम व लघु प्रकल्पात अपेक्षित जलसाठा झाला नाही. परिणामी, यंदाच्या हंगामात रबीचा पेरा घटेल, अशी भीती व्यक्त होत होती. मात्र, आतापर्यंत ३ लाख ३१ हजार ६३० हेक्टरवर रबीचा पेरा झाला आहे. जवळपास ११८ टक्के पेरणी झाली आहे.
पावणेतीन लाख हेक्टरवर हरभरा...जिल्ह्यात हरभऱ्याचा पेरा २ लाख ७१ हजार ४६२ हेक्टरवर झाला असून सध्या पीक वाढीच्या अवस्थेत आहे. काही ठिकाणी पीक फुलोऱ्यात आहे. दरम्यान, काही ठिकाणी मर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यासाठी पक्षीथांबे प्रति हेक्टर ५० उभारावेत. ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. मर रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बेडेझिम ५० डब्ल्यू पी १० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
ज्वारीचे पीक वाढीच्या अवस्थेत...जिल्ह्यात ३२ हजार ५५७ हेक्टरवर रबी ज्वारीचा पेरा झाला आहे. सध्या हे पीक वाढीच्या अवस्थेत आहे. काही ठिकाणी लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यासाठी ५ टक्के निंबोळी अर्काची अथवा ॲझाडिरॅक्टीन १५०० पीपीएम ५० मिली १० लिटर पाण्यातून फवारणी करावी. मेटा- हायझीयम ॲनिसोप्ली ५० ग्रॅम अथवा नोमुरिया रिलाई ५० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने केले आहे.
तुरीवर शेंगा पोखरणारी अळी...सध्या तूरीच्या शेंगा परिपक्वतेच्या अवस्थेत आहेत. तसेच काही ठिकाणी काढणीही सुरु झाली आहे. दरम्यान, काही ठिकाणी शेंगा पोखणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यासाठी ॲझाडिरॅक्टीन ३०० पीपीएम ५० मिली अथवा एच.ए.एन.पी.व्ही. विषाणूची ५ मिली अथवा फ्ल्यूबॅडामाईड ३९.३५ एससी २ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे, अशी माहिती कृषी अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील तंत्र अधिकारी शिवाजी तांदळे यांनी दिली.