लातूर : राष्ट्रीय आरोग्य अभियानअंतर्गत (एनएचएम) च्या कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीने शासकीय सेवेत समायोजन करण्यात यावे, या मागणीसाठी काम बंद आंदोलन करण्यात येत आहे. सोमवारी येथील जिल्हा परिषदेच्या प्रांगणात चटणी-भाकरी खाऊन आंदोलन करीत राज्य शासनावर संताप व्यक्त केला.
राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी व कर्मचारी समायोजन कृती समितीच्या जिल्हा शाखेच्या वतीने २५ ऑक्टोबरपासून शासकीय सेवेत समायोजन करण्यात यावे, या मागणीसाठी बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेसमोर ठिय्या मांडत शासनाने कंत्राटी कर्मचाऱ्यांचे शासकीय सेवेत समायोजन करावे, अशी मागणी करण्यात येत आहे. या आंदोलनात महाराष्ट्र राज्य समुदाय आरोग्य अधिकारी संघटना, कंत्राटी आयुष वैद्यकीय अधिकारी संघटना यासह अन्य विविध संघटनांचा समावेश आहे.
सोमवारी येथील जिल्हा परिषदेच्या प्रांगणात चटणी-भाकरी खाऊन आंदोलन करण्यात आले. तसेच शासनाच्या विरोधात जाेरदार घोषणा देण्यात आल्या. राष्ट्रीय आरोग्य अभियानातील सर्व कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर कायम करावे, अशी मागणी करण्यात आली यावेळी डॉ. शिवाजी गोडगे, डॉ. अजित पाटील, डॉ. चंद्रशेखर जाधव, डॉ. प्रमोद पाटील, गजानन डुमने, डॉ. अंतेश्वर हवण्णा, डॉ. रफी गातेगावकर, डॉ. गिरीश केंद्रे, डॉ. दीपक महाजन, संदीप त्रिकुळे, जमीर शेख, डॉ. शिफा खुरेशी, डॉ. फरहा शेख, डॉ. रूपाली गंगाबोणे, डॉ. सुरेखा राठोड आदी सहभागी झाले होते.