चाकूर : येथील बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदासाठी बुधवारी निवडणूक झाली. त्यात सभापतिपदी निळकंठ मिरकले, तर उपसभापती मंगल दंडिमे विजयी झाले आहेत.
चाकूर बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप युतीला दहा तर महाविकास आघाडीला आठ जागांवर विजयी मिळाला होता. बुधवारी बाजार समितीच्या सभागृहात सभापती-उपसभापती पदाची निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी एम. एस. लटपटे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी एन. एस. किलचे, सहायक निबंधक आर. एम. जोगदंड, सचिव प्रशांत मारकड यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रक्रिया पार पडली. सभापतिपदासाठी भाजपचे निळकंठ मिरकले तर महाविकास आघाडीचे यशवंत जाधव आणि उपसभापतिपदासाठी भाजपचे मंगल दंडिमे तर महाविकास आघाडीकडून उमाकांत अचवले यांनी उमेदवारी दाखल केली होती. सभापतिपदासाठी निळकंठ मिरकले यांना १०, तर यशवंत जाधव यांना ८ मते पडली. उपसभापतिपदासाठी मंगल दंडिमे यांना १० तर उमाकांत अचवले यांना ८ मते पडली. निवडणूक निर्णय अधिकारी लटपटे यांनी सभापतिपदी निळकंठ मिरकले तर उपसभापतिपदासाठी मंगल दंडिमे यांचा विजयी जाहीर करताच कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून गुलालाची उधळण करीत आनंदोत्सव साजरा केला.
यावेळी माजी आ. विनायकराव पाटील, माजी आ. सुधाकर भालेराव, माजी आ. बब्रूवान खंदाडे, माजी सभापती दिलीपराव देशमुख, बालाजी पाटील, चाकूरकर, जीवन मद्देवाड, निरीक्षक विक्रम शिंदे, ॲड. भारत चामे, अशोक केंद्रे, माजी सभापती प्रशांत पाटील, अशोक चिंते, ॲड. संतोष माने, सिद्धेश्वर पवार, अभिमन्यू धोंडगे, वीरनाथ मिरकले, श्रीमंत शेळके, दयानंद पाटील, मदन गायकवाड आदी उपस्थित होते.
बाजार समितीत सुविधा निर्माण करणार...चाकूर कृषी उत्पन्न बाजार समितीत अनेक सुविधांची उणीव आहे. शेतमाल विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना सुसज्ज विसावा, समितीच्या परिसराला संरक्षण भिंत, बाजार समितीतील सर्व व्यवहार पारदर्शक आणि संगणक प्रणालीवर करण्यात येणार आहेत. जास्तीत जास्त व्यापाऱ्यांना भूखंड देऊन व्यवहार वाढविण्याचे नियोजन असून, आदर्श बाजार समिती म्हणून नावलौकिक मिळवून देण्याचा प्रयत्न असल्याचे नूतन सभापती निळकंठ मिरकले यावेळी म्हणाले.