लातूर- मावशी, काकी, आजोबा घरात कोणी आहे का? बोला की ताई, बरं तुमच्या घरात सर्दी, ताप, खाेकला, अंगदुखी अशी लक्षणे कुणाला आहेत का? नाही, नाही कुणालाच काय नाही गं माय... हेच उत्तर बहुतांश आशा स्वंयसेविकांना ऐकावयास मिळत आहे. कोराेना आजाराविषयी ग्रामीण भागात अजूनही भीतीच असल्याने अनेकजण खरी माहितीच देत नाहीत. परिणामी, रुग्ण शोधण्यात अडचण निर्माण होत असल्याचे सांगितले जात आहे. सहा दिवसांत ३ हजार ८५८ जणांना लक्षणे आढळून आली असून यातील २ हजार ६०९ जणांना आशांनी रेफर केले आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य विभागाने आशा स्वंयसेविकांमार्फत ग्रामीण भागात सर्व्हे सुरू केला आहे. त्यात प्रामुख्याने सर्दी, ताप, खोकला, डोकेदुखी, अंगदुखी अशी लक्षणे असणाऱ्या रुग्णांना नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविले जात आहे. यासाठी आशा स्वंयसेविका दररोज घरोघरी भेटी देऊन माहिती घेत आहेत. मात्र, आशा दारात दिसल्या की अनेकजण दुरवरूनच आमच्या घरात कोणालाच काही नाही, असे सांगून माहिती द्यायलाही टाळाटाळ करीत आहेत. अशी लक्षणे असलेले रुग्ण तत्काळ रुग्णालयात गेले त्यांची तपासणी झाली तर लवकर निदान होते. यातून कुटुंबातील इतर सदस्यांनाही बाधा होण्याचा धोका वाढत नाही. आजारही लवकर आटोक्यात येतो, असे डॉक्टर सांगत असले तरी कोरोनाच्या भीतीने लक्षणेच लपविली जात आहेत.
२ हजार ६०९ जणांना रुग्णालयात पाठविले...
जिल्ह्यात १० मे पासून सर्दी, ताप, खोकला, डोकेदुखी, अंगदुखी आदी लक्षणे असलेल्या नागरिकांचा सर्व्हे केला जात आहे. सहा दिवसांत २ लाख कुटुंबाचा सर्व्हे करण्यात आला असून ३ हजार ८५८ जणांना लक्षणे असल्याची आढळून आली आहेत. यातील आवश्यकता असलेल्या २ हजार ६०९ जणांना रुग्णालयात पाठविण्यात आले. नागरिकांनी मनात भीती न बाळगता माहिती द्यावी, योग्यवेळी उपचार मिळाल्यास धावपळ होत नाही. आशा स्वंयसेविकांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी केले.