चाकूर पंचायत समितीवर भाजपाचे वर्चस्व असून भाजपा ८ आणि राष्ट्रवादी काँग्रेस २ असे पक्षीय बलाबल आहे. गत निवडीवेळी सभापतीपद खुल्या प्रवर्गासाठी होते. तेव्हा उमादेवी राजमाने या प्रमुख दावेदार होत्या. परंतु, अचानकपणे सभापतीपदी जमुनाबाई बडे तर उपसभापतीपदी सज्जनकुमार लोणाळे यांची वर्णी लागली होती. एक वर्षांनंतर दुसऱ्या सदस्यांना संधी देण्याचे ठरले होते. वर्ष उलटला तरी सभापती, उपसभापती हे पदावर होते. त्यामुळे भाजपातील काही सदस्यांत नाराजी निर्माण झाली होती.
सभापती, उपसभापती हे पंचायत समिती सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करतात. विकास कामांत हेतूपुरस्पर अडथळा निर्माण करतात, असे आरोप करीत भाजपचे सदस्य महेश व्हत्ते, सरिता मठपती, सुनिता डावरे, विद्या शिंदे, उमादेवी राजमाने, वसंतराव डिगोळे यांनी सभापती बडे व उपसभापती लोणाळे यांच्याविरूध्द अविश्वास ठराव दाखल करून सहलीवर गेले होते.
माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष आ. रमेश कराड यांनी या प्रकरणात लक्ष घातले. नाराज सदस्यांशी आ. कराड यांनी संपर्क साधला. त्यांची मते जाणून घेतली.
दरम्यान, पीठासीन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रभोदय मुळे यांनी शुक्रवारी पंचायत समिती सभागृहात विशेष बैठक बोलाविली होती. यावेळी तहसीलदार डॉ. शिवानंद बिडवे, गटविकास अधिकारी आकाश गोकनवार उपस्थित होते. याचवेळी आ. कराड यांनी सर्व सदस्यांना बोलावून सामंजस्यातून मार्ग काढण्यासाठी चर्चा करीत होते. त्यामुळे अविश्वास ठरावाच्या बैठकीकडे सदस्यांनी पाठ फिरविली. परिणामी अविश्वास ठराव बारगळला.