लातूर : कुठलाही रुग्ण आर्थिक अडचणींमुळे आरोग्य सेवेपासून वंचित राहू नये म्हणून राज्य शासनाकडून सरकारी रुग्णालयात १५ ऑगस्टपासून केसपेपर, तपासण्या, चाचण्या मोफत होणार आहेत. मात्र, त्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा समावेश नाही. परिणामी, येथे उपचारांसाठी जाणाऱ्या रुग्णांना आरोग्य सेवेसाठी पदरमोड करावी लागणार आहे.
नाममात्र दरात आरोग्य सेवेसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण, उपजिल्हा, सामान्य, जिल्हा रुग्णालय, तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहे. वंचित, दुर्बल अशा सर्व रुग्णांना १५ ऑगस्टपासून मोफत आरोग्य सेवा दिली जाणार आहे. त्यामुळे प्रत्येकास मोठा दिलासा मिळाला आहे. खर्चात मोठी बचत होणार आहे. दरम्यान, ही सेवा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व महापालिकेची रुग्णालये वगळता अन्य सरकारी रुग्णालयातून मिळणार आहे.
वास्तविक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्यसेवा मिळते. शिवाय, आवश्यक त्या तपासण्या, चाचण्या असतात. त्यामुळे रुग्णांचा ओढा वैद्यकीय महाविद्यालयाकडे असतो. मात्र, तिथे केसपेपरपासून तपासण्या, चाचण्यासांठी पैसे मोजावेच लागणार आहे. त्यामुळे रुग्णांची अडचण कायम राहणार आहे.
'जनआरोग्य'चे कवच; निदानापूर्वीच्या तपासण्यांचे काय?...महात्मा फुले जनआरोग्य आणि प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत १३५६ आजारांवर ५ लाखांपर्यंत उपचार मिळणार आहेत. योजनेची सुविधा विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात असल्याने मोफत उपचार, मोठ्या शस्त्रक्रिया होतात. मात्र, आजाराच्या निदानापूर्वीच्या तपासण्या, चाचण्यांसाठीचे शुल्क भरावे लागणार आहे. शिवाय, काही आजारांचा योजनेत समावेश नाही.
दैनंदिन रुग्ण नोंदणी...४००० - जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयअंतर्गतची रुग्णालये.३००० - प्राथमिक आरोग्य केंद्र.१५०० - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
चार महिन्यांत तीन हजार रुग्णांवर उपचार...महात्मा फुले जनआरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जनआरोग्यअंतर्गत सव्वाचार महिन्यांत एकूण ३ हजार ४३ रुग्णांवर उपचार, शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १११७, तर उर्वरित ११ रुग्णालयांत १९२६ रुग्णांवर उपचार करण्यात आले.
गरिब रुग्णांना दिलासा...जिल्ह्यात ५० प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. तिथे १५ ऑगस्टपासून केसपेपरसाठीही पैसे लागणार नाहीत. त्यामुळे तपासणी, उपचारांची मोफत सोय होणार आहे. त्याचा ग्रामीण भागातील गोरगरिबांना लाभ मिळणार आहे.- डाॅ. एच. व्ही. वडगावे, जिल्हा आरोग्य अधिकारी.
वैद्यकीय महाविद्यालयाचा समावेश दिसत नाही...ग्रामीण, उपजिल्हा, सामान्य रुग्णालयात नाममात्र दरात आरोग्यसेवा होती. नव्या निर्णयाने आता पूर्णपणे मोफत आरोग्य सेवा मिळणार आहे. त्याचा गरिबांना लाभ होणार आहे. मात्र, त्यात वैद्यकीय महाविद्यालयाचा समावेश दिसत नाही.- डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा शल्यचिकित्सक.
कार्य सुरू राहणारवैद्यकीय महाविद्यालयाचा उल्लेख नाही...राज्य सरकारच्या नि:शुल्क रुग्णसेवेच्या आदेशात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा समावेश नाही. त्यामुळे तो निर्णय आमच्यासाठी लागू होत नाही. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिवांच्या मार्गदर्शनानुसार आमचे पूर्वीप्रमाणे कार्य सुरू राहणार आहे.- डॉ. समीर जोशी, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय.