लातूर : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला अडचणी दिसत आहेत. त्यामुळेच त्यांच्याकडून विरोधी पक्षाच्या नेत्यांना दबाव टाकून फोडले जात आहे. स्पष्ट बहुमत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांनाही त्यांनी घेतले आहे. पण शरद पवारांचा विचार समतेचा, पुरोगामी आणि महाराष्ट्रधर्मी आहे. त्यामुळे त्यांच्यावर कितीही दबाव टाकला, संकटे आणली तरी हा सह्याद्री दिल्लीपुढे झुकणार नाही, असे मत आमदार रोहित पवार यांनी येथे सोमवारी व्यक्त केले.
लातूर येथील अंबाजोगाई रोडवरील अतिथी सभागृहात पत्रकारांशी ते बोलत होते. रोहित पवार म्हणाले, २०१९ च्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने आपल्या मित्र पक्षांना चांगली वागणूक दिली नाही. त्यांना विचारात घेतले नाही. परंतु आता इंडिया ही संघटना मजबुतीने त्यांच्या विरोधात उभी राहत आहे. त्यामुळे पुन्हा सरकार येणार नाही, असे वाटत असल्याने भारतीय जनता पार्टीकडून देशभरात फोडाफोडीचे राजकारण केले जात आहे. दबाव टाकला जात आहे. परंतु या दबावाला आम्ही बळी पडणार नाही. महाराष्ट्र धर्माची भूमिका निभावत राहू. याबाबत शरद पवार यांची स्पष्ट भूमिका असल्याचेही ते म्हणाले. पत्र परिषदेला प्रदेश सरचिटणीस संजय शेटे, बसवराज पाटील नागराळकर, आशाताई भिसे, शहर जिल्हाध्यक्ष राजा मणियार, ॲड. शेखर हवेली यांची उपस्थिती होती
नातेसंबंधातून साहेब आणि दादांची भेट...पक्ष म्हणून अजित पवार यांनी वेगळी भूमिका घेतली आहे. परंतु कुटुंब,नातेसंबंधात कुठलाही वाद नाही म्हणून आमच्या भेटी होत राहणार आहेत. दिवाळी असती तर आम्ही भेटलो असतो. परंतु भारतीय जनता पार्टीसोबत राष्ट्रवादी जाणार नाही. ही भूमिका शरद पवार यांनी स्पष्ट केलेली आहे. बीड येथे होणाऱ्या सभेत विस्ताराने ते आपली भूमिका स्पष्ट करतील असेही रोहित पवार म्हणाले.
कुटुंबावर संकट येण्याची शक्यता....कितीही दबाव टाकला तरी महाराष्ट्र धर्माची भूमिका पवार साहेब सोडणार नाहीत. त्यामुळे कुटुंबावर संकट येण्याची शक्यता आहे. तरीही आम्ही विचार बदलणार नाहीत. शरद पवार नावाचा एकटा माणूस लढतो आहे. त्यांचा सर्वाधिक विश्वास कार्यकर्त्यांवर आहे. पवार कुटुंबापेक्षा महाराष्ट्रतील जनता त्यांचे कुटुंब आहे. त्यासाठी ते लढत राहणार आहेत, असेही आ. रोहित पवार म्हणाले.