लातूर : चाकूर तालुक्यातील शिवणी, शिवणखेडमध्ये बिबट्यासदृश प्राणी दिसल्याने व काही पाऊलखुणा आढळल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदरील प्राण्यास जेरबंद करण्यासाठी वन विभागाने कर्मचाऱ्यांची दिवसरात्र गस्त सुरू केली आहे. दरम्यान, गेल्या चार दिवसांत अशा प्रकारच्या प्राण्याच्या पाऊलखुणा आढळून आल्या नसल्याने नागरिकांनी घाबरू नये, असे आवाहन वन विभागाने केले असले तरी नागरिकांच्या मनात भीती कायम आहे.
चाकूर तालुक्यातील शिवणखेड येथील एका म्हशीच्या वासराचा कुठल्या तरी वन्य प्राण्याने फडशा पाडल्याचे ५ मे रोजी निदर्शनास आले होते. त्यामुळे नागरिकांनी तत्काळ वनविभागास माहिती दिली होती. तेव्हा वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. मात्र, कुठल्याही वन्य प्राण्याच्या पाऊलखुणा दिसल्या नाहीत. दरम्यान, पुन्हा काही शेतकऱ्यांनी बिबट्या दिसल्याची माहिती दिली. त्यावरून वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तेथील परिसराची पाहणी केली असता बिबट्यासारख्या प्राण्याच्या पाऊलखुणा आढळून आल्या. त्याचे ठसे घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
पाच ट्रॅप कॅमेरे बसविले...चाकूर तालुक्यातील शिवणी व शिवणखेड परिसरात उसाचे फड आहेत. तसेच पाण्याची सुविधा आहे. त्यामुळे बिबट्यासदृश प्राण्याच्या पायांचे ठसे दिसून आले आहेत. सदरील प्राणी कोणता आहे, हे पाहण्यासाठी पाच ट्रॅप कॅमेरेही बसविण्यात आले आहेत, तसेच त्यास जेरबंद करण्यासाठी दोन पिंजरे लावण्यात आले आहेत. चार तालुक्यांतील पाच वनरक्षक व चार वनपाल दिवसरात्र गस्त घालत आहेत.
कोणीही एकटे फिरू नये...शिवणी व शिवणखेड परिसरात बिबट्यासदृश्य प्राणी दिसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितल्याने व काही पाऊलखुणा आढळल्याने या भागात गस्त सुरू आहे. तसेच ट्रॅप कॅमेरेही बसविण्यात आले आहेत. १४ मेपासून अशा प्रकारचा कुठलाही प्राणी आढळून आला नाही, तसेच पाऊलखुणाही आढळल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांनी घाबरू नये. मात्र, सतर्क राहावे. या परिसरातील शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळी एकटे फिरू नये. अफवांवर विश्वास ठेवू नये.- अश्विनी आपेट, वनपरिक्षेत्र अधिकारी.