लातूर : मुंबईच्या घाटकोपर येथील होर्डिंग कोसळल्याने १४ हून अधिक व्यक्तींचा जीव गेल्याने लातूर येथील होर्डिंग, युनिपोलचा विषय ऐरणीवर आला असल्याने मनपाने अनधिकृत होर्डिंगधारकांवर कारवाई सुरू केली आहे. मात्र, विसंगती असूनही युनिपोलबाबत निर्णय नाही. वाहतुकीला अडथळा होत नसल्याचे नाहरकत प्रमाणपत्र नसतानाही युनिपोलला परवानगी दिली आहे. दरम्यान, शहीद अहमदखान पठाण कृती समितीने घाटकोपर येथील मृतात्म्यांना युनिपोलजवळ श्रद्धांजली वाहून होर्डिंग, युनिपोलच्या विषयाकडे प्रशासनाचे आणखी लक्ष वेधले आहे.
लातूर महानगरपालिकेने युनिपोलचे काम दिलेल्या एजन्सीला २ जून २०२३ रोजी एक पत्र देऊन प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे आपण उभा करीत असलेल्या युनिपोलची रहदारीला, वाहतुकीला अडथळा होत नसल्याचे नाहरकत प्रमाणपत्र सादर करावे, असे म्हटले आहे. मात्र, एजन्सीने प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून नाहरकत न घेता शहर वाहतूक शाखेचे दिले आहे.
युनिपोलचा अपघात विमा, प्रत्येक युनिपोलचे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय लातूर येथून स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र, तसेच दहा बाय वीस फूट आकाराचे युनिपोल उभे करावेत. यापेक्षा जास्त आकाराचे युनिपोल उभारण्यात येऊ नयेत. प्रस्तुत कागदपत्रांची पूर्तता व सूचनांचे पालन करावे, असे निर्देश २ जून २०२३ रोजी दिले होते. यातील पहिल्या नाहरकत प्रमाणपत्राबाबत प्रादेशिक परिवहन कार्यालयाशी संपर्क साधला असता त्यांनी आमच्या कार्यालयातून असे प्रमाणपत्र गेले नसल्याचे सांगितले.
नियम, अटींचा भंग केल्याने करारनामा झाला होता रद्द...मनपा मालकीच्या मुख्य रस्त्यावरील दुभाजकामध्ये युनिपोलबाबत ठरलेली ५० टक्के रक्कम मुदतीत न भरल्यामुळे करारनाम्यातील अटींचा भंग झाला, असे नमूद करीत करार रद्द केल्याची नोटीस संबंधित एजन्सीला पाठविण्यात आली होती. मात्र, त्यानंतर या एजन्सीला पुन्हा युनिपोल बसविण्याचा परवाना कसा दिला, असा प्रश्न ॲड. मनोज कोंडेकर यांनी उपस्थित केला आहे.