अहमदपूर (लातूर ) : महात्मा बसवेश्वरांनी ‘काय कवे कैलास...’ हा सिद्धांत दिला. माणसाच्या कार्यातच देव आहे, असा या सिद्धांताचा मतितार्थ आहे. या विचारातून प्रेरणा घेऊन कर्मकांडविरहित समाजरचना निर्माण झाली पाहिजे. बलशाली भारत निर्माण करण्यासाठी समाज निर्व्यसनी असला पाहिजे, असा हितोपदेश राष्ट्रसंत शतायुषी डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांनी दिला.
डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज म्हणतात, भारत हा शेतीप्रधान देश आहे. या देशात शेतकरी सुखी असेल तर राष्ट्र सुखी राहील. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी शासनाने ठोस कार्य करण्याची गरज आहे. काश्मीरचा प्रश्न राजकीय आहे. त्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येऊन त्यावर मार्ग काढणे अपेक्षित आहे. तरच भारत एकसंघ राहील. कमी व योग्य आहार तसेच आहार, व्यवहारावर नियंत्रण ठेवल्याने माणूस दीर्घायुषी होऊ शकतो हेच आपल्याही दीर्घायुष्याचे रहस्य असल्याचे ते म्हणाले. माझे जीवन लोकांसाठी समर्पित आहे. त्यामुळे मी कोणत्याही पुरस्काराला महत्त्वाचे मानत नाही. शिवाय, पुरस्कारासाठी मी काम करीत नाही. लोकांनी केलेला गौरव हा पुरस्कारापेक्षाही श्रेष्ठ आहे. आपले पुढील जीवनही मानवी कल्याणासाठी समर्पित राहील.
डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे बालपण अहमदपूर येथे गेले. उर्दू माध्यमातून प्राथमिक शिक्षण, त्यानंतर वारद पाठशाळा येथे संस्कृतचे शिक्षण झाले. त्यांचे गुरु मडिवाळ शिवाचार्य यांनी त्यांना ‘तू कोणापुढेही हात पसरू नकोस, तुझे हात देण्यासाठी आहेत, मागण्यासाठी नाहीत, तू सर्वांना देणारा होशील’ असा आशिर्वाद दिला. गुरुंच्या या आशिर्वादामुळे महाराजांच्या आयुष्याला वेगळी कलाटणी मिळाली. त्यांनी आजपर्यंत कुठलीही दक्षिणा, वस्तू, हार, सुवर्ण घेतले नाही. भक्तांकडून अपेक्षा केली नाही. मडिवाळ मठाची १६ पिढ्यांची परंपरा असल्याने त्यांनी गुरुंच्या संपर्कात पुराणशास्त्राचा अभ्यास केला. उर्दू, कन्नड, तेलगु, संस्कृत, पंजाबी, मराठी, पारशी अशा विविध भाषांचे ज्ञान त्यांनी अवगत केले.
स्नातकोत्तर शिक्षण पंजाबमध्ये झाले. तिथे संघाच्या शाखेतून त्यांना शिस्त, आत्मनिर्भरता, चारित्र्यशील जीवन जगण्याचा मार्ग मिळाला. राष्ट्रनिर्मितीचे धडे संघातच मिळाले. १९४५ ला लाहोर विद्यापीठातून वैद्यकीय पदवी त्यांनी मिळविली. पण वैद्यकीय व्यवसाय त्यांनी केला नाही. जनसेवा हीच ईश्वर सेवा मानून त्यांनी लोककल्याणाच्या संप्रदायिक भक्तपरंपरेमध्ये स्वत:ला वाहून घेतले आहे.
प्रवचन, कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन...स्वातंत्र्यलढ्यातही त्यांनी सहभाग घेतला. १९४२ च्या चलेजाव आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदविला. पण भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर त्यांनी स्वातंत्रसेनानी ही बिरुदावली लावून घेतली नाही. कारण त्यांच्यामध्ये मातीची सेवा केली असता पुत्राने तिच्याकडून काही घेणे हे गैर आहे. म्हणूनच त्यांनी स्वातंत्र्य सेनानींना मिळणाऱ्या सवलती नाकारल्या. बलशाली भारत निर्माण करण्यासाठी व्यसनमुक्तीचे कार्य हाती घेतले. प्रवचन, कीर्तनाच्या माध्यामतून प्रबोधन तसेच रक्तदान शिबीर, वृक्ष लागवड व संवर्धन करून माणसाच्या कार्यात देव असल्याची भावना निर्माण केली.