औसा (जि. लातूर) : येथील तालुका कृषी कार्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांत समन्वय नाही. तसेच कार्यालयीन वेळेतही अधिकारी, कर्मचारी भेटत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना वारंवार खेटे मारावे लागतात. दरम्यान, बेलकुंड मंडळास सहा महिन्यांपासून कृषी सहाय्यक नसल्याने अनुदानासह इतर योजनांचा शेतकऱ्यांना लाभ मिळणे कठीण झाले आहे. वारंवार निवेदने देऊनही संबंधितांचे दुर्लक्ष होत असल्याने बुधवारी बेलकुंड येथील शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले.
तालुक्यातील बेलकुंडच्या कृषी सहाय्यकास येथील अधिकाऱ्यांनी कार्यालयीन कामकाजाचा अतिरिक्त पदभार दिला आहे. त्यामुळे बेलकुंड व परिसरातील कृषी विभागाचे काम ठप्प झाले आहे. परिणामी, अनुदानाच्या याद्यांसह पीकविमा, पंचनामे आदी कामे वेळेत न झाल्याने शेतकऱ्यांना त्याचा मोठा फटका बसला आहे. यासंदर्भात ग्रामपंचायतीसह शेतकऱ्यांनी सातत्याने अधिकाऱ्यांकडे कैफियत मांडली. पण, त्याकडे दुर्लक्ष केल्याने बुधवारी शेतकऱ्यांनी आंदोलनाची भूमिका घेत ठिय्या मांडला.
यावेळी सरपंच विष्णू कोळी, शकिल शेख, व्यंकट सांळुके, नानासाहेब निकते, संदीपान हलकरे, मैनोद्दीन पठाण, अशोक जाधव, मैनोद्दीन पठाण, भीमराव शिंदे, दत्तू पवार, पांडुरंग सिरसाट, इरशाद पठाण आदींचा समावेश होता.
अतिरिक्त पदभारातून कृषी सहाय्यक मुक्त...तालुका कृषी कार्यालयातील अनागोंदी कारभाराच्या विरोधात आंदोलन करताच कृषी सहाय्यक ए.आर. काळदाते यांच्याकडील अतिरिक्त पदभार काढून घेण्यात आले. त्यासंदर्भातील पत्र आंदोलनकर्त्यांना देण्यात आले.