- राजकुमार जोंधळे
लातूर : शहरासह जिल्ह्यातील वेगवेगळ्या मार्गांवर राबविण्यात आलेल्या तपासणी माेहिमेत हेल्मेट न वापरणाऱ्या ८९७ माेटारसायकलधारकांसह इतर नियम माेडणाऱ्या तब्बल १३ हजार ३५१ वाहनचालकांवर पाेलिसांतर्फे कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. त्यांच्याकडून तब्बल ४३ लाख ३१ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. सदरची कारवाई जानेवारी ते नाेव्हेंबरअखेरपर्यंत करण्यात आली.
हेल्मेट न वापरणे यासह अन्य नियमांचे उल्लंघन वाहनधारकांनी केल्याचे तपासणीत समाेर आले आहे. लातूर शहर वाहतूक शाखा आणि त्या-त्या पाेलीस ठाण्यांच्या हद्दीतील पथकांकडून वाहन तपासणी माेहीम राबविण्यात आली. जानेवारी ते नाेव्हेंबर या कालावधीत तब्बल १३ हजार ३५१ माेटारसायकलधारकांवर दंडात्मक कारवाई केली. यामध्ये चुकीच्या दिशेने वाहन चालविणे, हेल्मेट न वापरणे, सिग्नल माेडणे आणि नाे पार्किंगमध्ये वाहन पार्किंग करणे आदी वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याचे समाेर आले आहे.
चुकीच्या दिशेने वाहन चालविणाऱ्या एकूण २ हजार २४० माेटारसायकलधारकांवर खटले दाखल केले असून, त्यांच्याकडून २२ लाख ४० हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. हेल्मेट न वापरणाऱ्या ८९७ वाहनधारकांना ४ लाख ४८ हजार ५०० रुपयांचा दंड ठाेठावला. सिग्नल माेडणाऱ्या २ हजार १३२ वाहनधारकांना ४ लाख २६ हजार ४०० रुपयांचा दंड ठाेठावला. नाे पार्किंगप्रकरणी एकूण ८ हजार ८२ माेटारसायकलधारकांना तब्ब्ल १६ लाख १६ हजार ४०० रुपयांचा असा एकूण ४७ लाख ३१ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल केल्याची माहिती लातूर शहर वाहतूक शाखेचे पाेलीस निरीक्षक एस. यू. पटवारी यांनी दिली.
अपघातात १५० मृत्यूलातूर जिल्ह्यात जानेवारी ते नाेव्हेबर या कालावधीत दुचाकीच्या एकूण १४० अपघातांच्या घटना घडल्या असून, यात १५० जणांचा मृत्यू झाला. ६४ जण जखमी झाले आहेत. केवळ वाहनांवर नियंत्रण नसणे, वाहतूक नियमांचे हाेणारे उल्लंघन हे या अपघाताला कारणीभूत ठरले आहेत. हेल्मेट न वापरणे हेच मृत्यूला आमंत्रण ठरले असल्याचेही पाेलीस निरीक्षक पटवारी म्हणाले.