लातूर : शहरातील इस्लामपुरा-तावरजा काॅलनीत रविवारी सायंकाळी फुग्यामध्ये हवा भरताना गॅस सिलिंडरचा स्फाेट झाला. या दुर्घटनेत फुगेविक्रेता रामा नामदेव इंगळे (५०) हा जागीच ठार झाला. तर ११ मुले गंभीर भाजली. आता स्फाेटाच्या कारणांचा स्थानिक पाेलिस, लातूर आणि नांदेड एटीएस पथकाकडून शाेध घेतला जात आहे. घटनास्थळावरून गॅस सिलिंडरचे अवशेष, दुचाकी जप्त केली आहे. ते न्यायवैद्यक प्रयाेगशाळेला पाठविले असून, ‘सीए’च्या अहवालानंतर कारणांची उकल हाेणार आहे.
बीड जिल्ह्यातील रामा नामदेव इंगळे (रा. वाघाळा राडी, ता. अंबाजाेगाई) हे बांधकाम क्षेत्रात मिस्त्री म्हणून काम करत हाेते. दरम्यान, त्यांनी एक वर्षापूर्वी फुगे विक्रीचा व्यवसाय सुरू केला हाेता. घटनास्थळावर गॅसची टाकी पूर्णत: चपटी झाली, ती जुनी असल्याचे समाेर आले आहे. गॅसची टाकी कशी हाताळावी? याबाबत त्यांना फारशी माहिती नसल्याचा प्राथमिक अंदाज पाेलिसांनी वर्तविला. बांधकाम क्षेत्रात मिस्त्री म्हणून काम करताना ओढाताण हाेत हाेती. या क्षेत्रात फारसे काम मिळत नसल्याने त्यांनी फुगे विक्रीच्या व्यवसायात आपली ‘भाकर’ शाेधण्याचा प्रयत्न केला. मात्र, याच व्यवसायाने रामा यांचा शेवटी घात केला. स्फाेटात त्यांना आपले प्राण गमवावे लागले. घरात आठराविश्व दारिद्र्य असल्याने गावकऱ्यांनीच वर्गणी गाेळा करून त्यांचा अंत्यसंस्कार केला.
तांत्रिक माहितीच्या अभावाने केला घात...फुगे विक्रीच्या व्यवसायात आल्यानंतर हवा भरण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या गॅस सिलिंडरबाबत फारशी माहिती रामा यांना नसल्याचे पाेलिस तपासात समाेर आले आहे. तांत्रिक माहितीचा अभाव अन् ऐनवेळी सिलिंडर लिकेज झाल्यानंतर काय दक्षता घ्यावी, याची माहिती नसल्याने त्यांनी जवळ असलेल्या लहान मुलांना वाचविण्यासाठी पळा... पळा... म्हणात गॅस सिलिंडरलाच कवटाळले. यावेळी झालेल्या स्फाेटामध्ये त्यांचा जाग्यावरच जीव गेला. हा स्फाेट एवढा माेठा हाेता की, जवळपास असलेली ११ मुले गंभीर भाजली.
९ जखमी मुलांची प्रकृती स्थिर...गॅस सिलिंडरच्या स्फाेटात जखमी झालेल्या ११ मुलांपैकी एकाला साेमवारीच सुटी देण्यात आली आहे. तर दाेघांची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. सात जणांवर लातूर येथील शासकीय रुग्णालयातील जनरल वाॅर्डात उपचार सुरू आहेत. - डाॅ. शैलेंद्र चव्हाण, प्रभारी अधिष्ठाता, लातूर
‘सीए’च्या अहवालानंतर कारणांचा हाेणार उलगडा...घटनास्थळावर मिळालेली दुचाकी, स्फाेटात चेंदामेंदा झालेला गॅस सिलिंडर, स्फाेटक पदार्थ न्यायवैद्यक प्रयाेगशाळेत पाठविण्यात आले आहे. तेथील सीए - केमिकल अनालायझर (रासायनिक विश्लेषक) अहवालानंतर स्फाेटाच्या कारणांचा उलगडा हाेणार आहे. टाकी वेल्डरकडून तयार करून घेतल्याचे दिसून येत आहे. - अनिल कांबळे, पाेउपनि. लातूर