लातूर : ग्रामीण भागातील जनतेचे प्रश्न, शासनस्तरावरील कामे यासंदर्भात प्राप्त होणारी निवेदने, अर्जांवर जलद गतीने कार्यवाही व्हावी, यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मुख्यमंत्री सचिवालय कक्ष सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हास्तरावर येणाऱ्या समस्यांचा जलद गतीने निपटारा करण्यात येणार असून, शासनाशी निगडीत असलेले निवेदने शासनस्तरावर पाठविण्यात येणार आहेत.
जिल्ह्यातील उपलब्ध असलेले अधिकारी, कर्मचारी यांच्यामधून आवश्यक अधिकारी, कर्मचारी यांच्या सेवा मुख्यमंत्री सचिवालय कक्षासाठी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे हे या कक्षाचे पदसिद्ध विशेष कार्य अधिकारी राहणार असून, नायब तहसीलदार व एक महसून सहायक या कक्षाचे काम पाहणार आहेत. जनतेकडून मुख्यमंत्री यांना उद्देशून लिहिलेली दैंनदिन अर्ज, निवेदने या कक्षामध्ये स्विकारली जाणार असून, त्याबाबतची पोचपावती संबधितांना देण्यात येणार आहे.
जिल्हास्तरावरील निवेदन लोकशाही दिनाच्या पुर्वी सोडविली जाणार असून, सर्वच विभागप्रमुखांची बैठक घेतली जाणार आहे. तसेच ज्या प्रकरणांमध्ये शासन स्तरावरुन कार्यवाही होणे अपेक्षित आहे असे सर्व अर्ज मुंबई येथील मुख्यमंत्री सचिवालायाचे अपर मुख्य सचिव यांच्याकडे सादर करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत सांगितले.
ई-मेलवरही अर्ज सादर करता येणार...लातूर जिल्ह्यातील नागरिकांना आपले अर्ज मुख्यमंत्री सचिवालय कक्ष, दुसरा मजला नवीन जिल्हाधिकारी कार्यालय येथे तसेच cmolatur@gmail.com या ई-मेलवर सादर करता येणार आहेत. न्यायिक स्वरुपातील अर्ज व शासकीय कर्मचारी यांचे सेवेविषयी अर्ज या कक्षात स्विकारले जाणार नसल्याचेही जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी सांगितले.