लातूर: जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळेतील वर्गाच्या दर्शनी भागात 'आपले गुरूजी' या उपक्रमांतर्गत संबंधित शाळेतील शिक्षकांचे फोटो लावण्यात येणार असून, शिक्षण उपसंचालक डॉ. गणपत मोरे यांनी प्राथमिक आणि माध्यमिकच्या शिक्षणाधिकारी यांना याबाबत सूचना केल्या आहेत. त्यानुसार शाळा स्तरावर या उपक्रमाची अंमलबजावणी होणार आहे.
विद्यार्थ्यांमध्ये शिक्षकांप्रती आदराची भावना निर्माण व्हावी हा या उपक्रमाचा उद्देश असून, राज्याच्या शिक्षण विभागाकडून 'आपले गुरुजी' हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. लातूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना शिक्षण उपसंचालकांनी पत्र पाठविले असून, शाळा स्तरावर अंमलबजावणी करण्याच्या सूचना केल्या आहेत. विशेष म्हणजे शाळांनी अंमलबजावणी केली की नाही याचा अहवालही सादर करावा लागणार आहे. या उपक्रमासाठी शिक्षकांचे फोटो योग्य आकारातील पाहिजे असेही पत्रात म्हंटले आहे. दरम्यान, शाळांनी उपक्रमाची अंमलबजावणी करून त्याचा अहवाल २९ ऑगस्ट पर्यंत सादर करावा लागणार आहे. त्यानंतरच किती शाळा गुरुजींचे फोटो लावतात हे स्पष्ट होणार आहे.
उपक्रमामुळे काय फायदा होणार?बहुतांश शाळेतील विद्यार्थ्यांना आपल्या शाळेत किती शिक्षक आहे, कोणकोणते शिक्षक आहे हे माहिती नसते. मात्र, शिक्षण विभागाच्या उपक्रमामुळे कोण शिक्षक आहे, त्यांची संख्या किती हे विद्यार्थ्यांसमोर येणार आहे. सोबतच त्यांच्याविषयी आदरभाव वाढण्यास मदत होणार आहे.
तीन जिल्ह्यात होणार अंमलबजावणी...लातूर, नांदेड, उस्मानाबाद जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना आपले गुरुजी उपक्रमांतर्गत शाळेतील शिक्षकांचे योग्य आकारातील फोटो लावण्याच्या सूचना केल्या आहेत. शाळांनी केलेल्या अंमलबजावणीचा अहवालही मागविण्यात येणार असल्याचे विभागीय उपसंचालक डॉ. गणपत मोरे यांनी सांगितले.