लातूर : आपले प्रलंबित प्रश्न सोडवावेत म्हणून सेविका व मदतनिसांनी ३८ दिवसांपासून संप सुरु केला आहे. नोटिसा बजावूनही जिल्ह्यातील १ हजार ८८६ अंगणवाड्यांचे कुलूप अद्याप निघाले नाही. त्यामुळे प्रशासनाने आता अंगणवाड्या सुरु करण्यासाठी ग्रामपंचायतींची मदत घ्यावी, अशा सूचना केल्या आहेत. परिणामी, सर्वांचे लक्ष वेधले आहे.
अंगणवाड्यांच्या माध्यमातून ३ ते ६ वयोगटातील बालकांना शालेय पूर्व शिक्षण दिले जाते. त्याचबरोबर कुपोषण निर्मूलनासाठी सहा वर्षपर्यंतच्या बालकांना पोषण आहार दिला जातो. त्याचबरोबर गरोदर महिला, स्तनदा मातांमध्ये आरोग्यासंदर्भात जनजागृती करुन त्यांनाही पोषण दिला जातो. आपल्या विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी ४ डिसेंबरपासून राज्यव्यापी बंद पुकारला आहे. दरम्यान, कामावर रुजू व्हावे म्हणून प्रशासनाकडून नोटिसा बजावण्यात येत आहे. त्याविरोधात अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघाच्या वतीने सोमवारी धरणे आंदोलन करण्यात आले.
जिल्ह्यातील केवळ ४३८ अंगणवाड्या सुरु...जिल्ह्यात एकूण २ हजार ३२४ अंगणवाड्या आहेत. बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडून सेविका व मदतनीसांना नोटिसा बजावण्यात आल्याने बुधवारपर्यंत ४३८ अंगणवाड्या सुरु झाल्या आहेत. अद्यापही १ हजार ८८६ अंगणवाड्या सुरु झाल्या नाहीत. त्यामुळे प्रशासनापुढेही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
उदगीरातील सर्वाधिक कर्मचारी कामावर...तालुका - कामावरील सेविका, मदतनीसअहमदपूर - ५४औसा - ३१चाकूर - ५०देवणी - ११जळकोट - ४८लातूर - ६६निलंगा - १४रेणापूर - ११शिरुर अनं. - २१उदगीर - १३२एकूण - ४३८
३२४ अंगणवाड्यातून आहार पुरवठा...जिल्ह्यातील ३२४ अंगणवाड्यांतून लाभार्थ्यांना सकस आहाराचा पुरवठा करण्यास सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर १७ ठिकाणच्या अंगणवाड्यातील लाभार्थ्यांना प्राथमिक शाळेच्या स्वयंपाकीकडून आहार दिला जात आहे. तसेच बचत गटाचा आधार घेत १६६ ठिकाणी पोषण आहार पुरविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाकडून देण्यात आली.
जिल्ह्यातील अंगणवाड्या सुरु करण्यासाठी नवा प्रयत्न...एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्तांनी अंगणवाड्या सुरु करण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यासंदर्भात २२ डिसेंबर रोजी काही सूचना केल्या होत्या. मात्र, त्यास अपेक्षित यश आले नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता गटविकास अधिकाऱ्यांसोबत संयुक्त बैठक घेऊन अंगणवाड्या सुरु करण्यासाठी ग्रामपंचायतींचे सहकार्य घ्यावे, असे स्पष्ट केले आहे.
लवकरच बीडीओंसोबत संयुक्त बैठक घेणार...अंगणवाड्या सुरु करण्यासाठी आयुक्तांच्या आदेशानुसार अधिकाधिक प्रयत्न सुरु आहेत. आतापर्यंत ४३८ अंगणवाड्या सुरु झाल्या आहेत. नोटिसांची मुदत सोमवारपर्यंत संपणार आहे. त्यानंतर कार्यवाही केली जाईल. दरम्यान, वरिष्ठांच्या निर्देशानुसार बीडीओंसाेबत संयुक्त बैठक घेऊन ग्रामपंचायतींची मदत घेतली जाणार आहे.- जावेद शेख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालकल्याण.