लातूर : शहर मनपा हद्द तसेच जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आणि शहरी भागात नोंदणीकृत असलेली एकूण ५८२ खासगी रूग्णालये आहेत. बाॅम्बे नर्सिंग ॲक्टनुसार या रूग्णालयांची नोंदणी करण्यात आली आहे.
जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि महानगर पालिकेच्या आरोग्य विभागात ही नोंदणी केली जाते. जिल्हा शल्य चिकित्सकांकडे शहरी भागातील आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे ग्रामीण भागातील डाॅक्टरांची नाेंदणी करण्यात येते. तर मनपा हद्दीतील डाॅक्टरांची मनपाच्या आरोग्य विभागात नोंदणी होते. त्यानुसार जिल्ह्यात ५८२ रूग्णालये आहेत.
गेल्या वर्षभरात १७ रूग्णालयांची नोंदणी
सन २०२०मध्ये १७ रूग्णालयांची नोंदणी झाली आहे. त्यात जिल्हा शल्य चिकित्सकांकडून मान्यता घेतलेल्या रूग्णालयांची संख्या पाच आहे. तर तीन रुग्णालयांची नोंदणी त्रुटी असल्यामुळे प्रलंबित आहे. २०१९मध्ये सात रुग्णालयांची नोंदणी झाली होती.
नोंदणी न करणे गुन्हा; तीन वर्षांनी नूतनीकरण
बाॅम्बे नर्सिंग ॲक्टनुसार खासगी रूग्णालयांनी नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी झाल्यानंतरही दर तीन वर्षांनी नूतनीकरण करणे आवश्यक असते. नोंदणी न केल्यास कायद्याने गुन्हा ठरतो. गंभीर स्वरूपाचा गुन्हाही दाखल केला जातो.
शहर, ग्रामीण आणि मनपा हद्दीनुसार नोंदणी
जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक आणि मनपाच्या आरोग्य विभागाकडे या ॲक्टनुसार नोंदणी केली जाते. ग्रामीण भागाची नोंदणी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे, शहरातील डाॅक्टरांची नोंदणी जिल्हा शल्य चिकित्सकांकडे तर मनपा हद्दीतील नोंदणी महानगरपालिकेकडे केली जाते. त्यानुसार ही नोंदणी आहे. - डाॅ. एल. एस. देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक