शिरूर अनंतपाळ (जि. लातूर) : येथील राज्यमार्गावर मोकाट जनावरांची टक्कर झाली. त्यात एकजण सापडल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली.
शिरुर अनंतपाळ येथे जवळपास ३० ते ३५ सोडलेली मोकाट जनावरे आहेत. ही जनावरे नेहमीच मुख्य रस्त्यावर ठाण मांडून असतात. मोकाट फिरताना अनेकदा त्यांच्यात टकरी लागतात. या टकरीत यापूर्वी काहीजण जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात येत होती.
दरम्यान, शनिवारी रात्री मोकाट जनावरांची टक्कर लागली. रस्त्याच्या बाजूस उभे असलेले येथील ज्येष्ठ नागरिक विश्वनाथ झटिंग गायकवाड (६६) हे जनावरांच्या टक्करीत सापडून गंभीर जखमी झाले. त्यामुळे त्यांना उपचारासाठी येथील सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले असता डाॅक्टरांनी मयत झाल्याचे घोषित केले. मयत विश्वनाथ गायकवाड यांच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करुन रविवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे.
बारा जनावरांचा बंदोबस्त...शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी नगरपंचायत, पंचायत समितीचा पशुसंवर्धन विभाग, पशुवैद्यकीय दवाखाना, ग्रामदैवत विश्वस्त समिती, वनविभाग आणि पोलीस अधिकारी, कर्मचा-यांनी पुढाकार घेतला आहे. १२ जनावरे पकडण्यात आली आहेत, असे नगरपंचायत प्रशासनाकडून सांगण्यात आले.