शिरूर अनंतपाळ (जि़लातूर) : जुन्या भांडणाची कुरापत काढून बस स्थानकावर बोलत थांबलेल्या राजेंद्र रघुनाथ जाधव (३४) या युवकाचा चाकूने भोसकून खून करण्यात आल्याची घटना निलंगा तालुक्यातील शिरोळ वांजरवाडा येथे सोमवारी सकाळी ९:३० वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्यात सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, एकास अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी सांगितले, शिरोळ वांजरवाडा येथील बसस्थानकानजिकच्या एका हॉटेल समोर फिर्यादी प्रसाद जाधव आणि राजेंद्र रघुनाथ जाधव (३४) हे दोघे चुलतभाऊ सकाळी ९:३० वाजण्याच्या सुमारास बोलत थांबले होते. यावेळी सुरेश दिलीप जाधव याने गैरकायद्याची मंडळी जमवून जुन्या भांडणाची कुरापत काढली़ यावेळी गणेश दिलीप जाधव, संतोष दिलीप जाधव, विक्रम विश्वास जाधव, विश्वास रावसाहेब जाधव, दिलीप रावसाहेब जाधव, भरत रावसाहेब जाधव (सर्व रा़ शिरोर वांजरवाडा) यांनी भांडणाची कुरापत काढत शिवीगाळ, धक्काबुक्की करत जीवे मारण्याची धमकी दिली़ याप्रसंगी राजेंद्र रघुनाथ जाधव यांच्या पाठीत हातातील चाकूने वार करून गंभीर जखमी करण्यात आले. दरम्यान, राजेंद्र जाधव यास उपचारासाठी घेऊन जात असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी प्रसाद जाधव यांनी शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार सात जणांविरूद्ध कलम ३०२, १४३, १४७, १४८, १४९, ३२३, ५०४, ५०६ भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणातील सुरेश दिलीप जाधव यास पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे़ अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.
तपासासाठी दोन पथके रवाना...याप्रकरणातील सात पैकी एका आरोपीस अटक करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक डॉ. राजेंद्र माने यांच्या सुचनेनुसार उपविभागीय पोलीस अधिकारी काळे यांच्या मार्गदर्शनात तपास अधिकारी परमेश्वर कदम यांनी तपासासाठी दोन पथके नियुक्त केली आहेत. उर्वरित सहा आरोपींचा शोध घेण्यात येत असून, लवकरच त्यांनाही अटक करण्यात येईल, अशी माहिती पो.नि. कदम यांनी दिली.