लातूर : लातूर-उस्मानाबाद जिल्ह्यात मोठ्या उत्साहात दर्श-वेळा अमावास्या साजरी होते. यंदाही ही अमावास्या उत्साहात साजरी झाली. शेतशिवार माणसांनी फुलून गेली होती. ओलगे.. ओलगे... सालन पोलगे... असा गजर शेतशिवारांत घुमत होता. पूजेनंतर वनभोजनाचा आस्वाद घेण्यात आला. सहकुटुंब मनोभावे पांडवांची आणि काळ्या आईची पूजा केल्यानंतर भोजनाच्या पंगती शेतशिवारांनी होत्या.
शेतात अंबिल व भजीवर ताव मारून माणसं आनंदी झाल्याचे चित्र पहायला मिळाले. लातूर जिल्ह्याच्या प्रत्येक गावाच्या शिवारात कडब्याची कोप तयार करून पांडवांची पूजा सहकुटुंब केली जात होती. उंडे, रोडगा व सर्व भाज्या एकत्र करून तयार केलेली भजी, तांदळाची तसेच गव्हाची खीर, अंबिल, भात, बाजरीची भाकरी, कोंदीची भाकर, कडक भाकर, धपाटे, वांग्याचे भरीत अशा अनेक पदार्थांचा मेन्यू शेतशिवारांत झालेल्या पंगतीमध्ये दिसून आला.
लातूर शहरामधील रस्ते निर्मनुष्यशहरातील सर्व कुटुंबीय शेतामध्ये गेल्यामुळे लातूर शहरातील रस्ते निर्मनुष्य झाले होते. जणूकाही अघोषित संचारबंदी आहे अशी दुपारी ५ वाजेपर्यंत शहरातील स्थिती होती. ज्यांना शेत नाही, असे कुटुंबीय मित्र, नातेवाइकांकडे तसेच शहरातील उद्यानांमध्ये होती. तेथेच त्यांनी वनभोजनाचा आस्वाद घेतला.
वेळा अमावास्याचा उत्साह...शुक्रवारी सकाळपासूनच शेताकडे जाण्याची लगबग सर्वत्र दिसून आली. गावागावातून बैलगाडी, ट्रॅक्टर, ऑटो, छोटा हत्ती आणि दुचाकींवरून शेतकरी, त्यांचे नातेवाईक शेतशिवारांकडे जात होते. लातूर शहरामध्ये सकाळी १० नंतर रस्त्यांवर शुकशुकाट होता. शहरातील उद्यानेही माणसांनी फुलली होती. त्यामुळे रस्त्यांवर दिवसभर शुकशुकाट होता. सायंकाळनंतर बाजारपेठेत थोडी वर्दळ सुरू झाली. काहींनी दुकानेही उघडली.