- महेश पाळणे
तब्बल ५० वर्षानंतर लातूरच्या मल्लाने महाराष्ट्र केसरी स्पर्धेत अंतिम फेरी गाठली़ यापूर्वी १९६९ साली उस्मानाबाद जिल्हा असताना रूस्तूमे हिंद हरिश्चंद्र बिराजदार यांनी महाराष्ट्र केसरीचा किताब पटकाविला होता़ ५० वर्षानंतर पुन्हा लातूरच्या शैलेश शेळकेने अंतिम फेरी गाठल्याने लातूरची कुस्ती पुन्हा चर्चेत आली. यानिमित्त उपमहाराष्ट्र केसरी शैलेश शेळके याच्याशी साधलेला संवाद़
महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील अनुभव कसा राहिला?यावर्षी मला मुख्यत: गादीवर खेळायचे होते़ मात्र जिल्हा संघात यासाठी जागा नव्हती़ त्यामुळे मातीतील सरावासाठी केवळ एक महिनाच वेळ मिळाला़ मुख्यत: मी गादीवरच ग्रीकोरोमन खेळत असे़ फ्री स्टाईल खेळण्याचा सराव कमी होता़ केवळ एक महिन्याच्या सरावावर मी अंतिम फेरी गाठली़ किताबी लढतीपर्यंत जाण्याची अपेक्षा होती का? मुळात या स्पर्धेत दिग्गज मल्ल होते़ माती विभागातील उपांत्य फेरीत तगडा मल्ल गणेश जगतापवर मात केल्यानंतर आत्मविश्वास बळावला़ त्यावेळी वाटले आता मी कोणालाही हरवू शकतो़ तत्पूर्वी इथपर्यंत जाण्याची अपेक्षा नव्हती़ यासह माती विभागात माऊली जमदाडे व उपांत्य फेरीत संतोष दोरवडवर मिळविलेला विजयही जोश देणारा होता़
माती व गादी विभागातील लढतीमधील फरक वाटतो का? नियमित ग्रीकोरोमन खेळणारा मी मल्ल असल्याने मातीतील सराव खूप दिवसापासून बंद होता़ याच स्पर्धेत मी गादी विभागातून खेळलो असतो तर निकाल वेगळा दिसला असता़ किताबी लढतीत हर्षवर्धनने केलेला शेवटचा अटॅक मला महागात पडला़ जर मी गादी विभागातून खेळत आलो असतो तर हा त्याचा डाव मी धुडकावून लावला असता़ असा फरक माती व गादीत वाटतो़ त्यामुळे येणाऱ्या काळात या चुकावर नियंत्रण ठेऊन उत्कृष्ट खेळ करू़
भारताकडून खेळत पदक जिंकणाऱ़पुढील वर्षी महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पूर्ण तयारीनिशी उतरू व यंदाच्या वर्षातील अपूरे स्वप्न पूर्ण करू़ महाराष्ट्र केसरीसह भारताकडून खेळत देशाला सुवर्णपदक जिंकून देण्याचे ध्येय असून, सर्वोच्च असलेल्या आॅलम्पिक स्पर्धेत भारताचा तिरंगा फडकविण्याचे स्वप्न आहे़ लातूरच्या रूस्तूम- ए- हिंद हरिश्चंद्र बिराजदार व अर्जूनवीर काका पवार यांच्या प्रमाणेच कुस्तीत आपले नाव व्हावे, या दृष्टीने सर्वोतोपरी कष्ट उपसण्याची तयारी ठेवली आहे़