लातूर: जिल्ह्यात दिवसभर उसताेडीचे काम करायचे, रेकी करायची आणि रात्रीच्या वेळी ती घरे फाेडणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील दराेडेखाेरांच्या टाेळीतील एकाला स्थागुशाने निलंगा येथून अटक केली. त्याच्याकडून सव्वा दाेन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दिवसा उसताेडीवर अन् रात्री घरफाेडीवर... अशीच माेहीम या टाेळीतील दराेडेखाेरांनी राबविल्याचे समाेर आले आहे.
लातूर जिल्ह्यातील विविध गावांच्या शिवारात उसताेडीसाठी शेजारच्या नांदेड जिल्ह्यातून उसताेड कामगार माेठ्या प्रमाणावर दरवर्षी दाखल हाेतात. यातील एका टाेळीतील दाेघांनी दिवसा गावातील घरांची रेकी केली आणि ती घरे रात्रीच्या वेळी फाेडल्याचा प्रकार सामाेर आला आहे. या घरफाेडीचा तपास करण्याचे आदेश जिल्हा पाेलिस अधीक्षक साेमय मुंडे यांनी दिले हाेते.
दरम्यान, अप्पर पाेलिस अधीक्षक डाॅ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पाेलिस निरीक्षक संजिवन मिरकले यांच्या पथकाने चाेरट्यांचा माग काढला. रेकाॅर्डवरील गुन्हेगारांचीही कुंडली तपासली. चाेरट्यांच्या मागावर असलेल्या स्थागुशाच्या पथकाला हाडगा ते निलंगा मार्गावर दुचाकीवरील दाेघे संशयास्पद फिरताना आढळले. पाठलाग करुन नामदेव किशन भाेसले (रा. मंग्याळतांडा ता. मुखेड जि. नांदेड) याला पकडले. त्यांना पकडले असता, एक जण पाेलिसांच्या हातून निसटला. एक जण पाेलिसांच्या हातून निसटला. त्याच्याकडे असलेल्या कापडी पिशवीत घराफाेडीतील साेन्याचे दागिने हाेते. ते विक्री करण्याचा प्रयत्न करत हाेते. हे दागिने साथीदारांसाेबत कासार सिरसी, औसा, किल्लारी पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील गावात केलेल्या घरफाेडीतील असल्याचे सांगितले. त्याच्याकडून सव्वा दाेन लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई स्थानिक गुन्हा शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण राठोड, अमलदार माधव बिलापट्टे, नवनाथ हासबे, मोहन सुरवसे, राजेश कंचे, रामभाऊ मस्के, तुराब पठाण, जमीर शेख, संतोष खांडेकर, नकुल पाटील यांच्या पथकाने केली.
पथकावर चाकू हल्ला केल्याची दिली कबुली...कासार सिरसी पाेलिस ठाण्याच्या हद्दीत पाेलिसांनी या टाेळीचा पाठलाग केला असता, यातील चाेरट्यांनी पाेलिस पथकावर चाकू हल्ला करण्याचा प्रयत्नही केला. यामध्ये एक जण जखमी झाल्याची घटना घडली. या चाकूहल्ल्याची कबुलीही अटकेतील चाेरट्याने दिली आहे. याबाबत कासारसिरसी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाेलिसांकडून टाेळीतील इतरांचा शाेध घेतला जात आहे.