लातूर : पुणे-लातूर-पुणे इंटरसिटी रेल्वेचे स्वागत हरंगुळ येथील रेल्वे स्थानकावर जल्लोषात करण्यात आले. यावेळी लातूर शहरातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची स्थानकावर उपस्थिती होती. पुण्याहून आलेल्या प्रवाशांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे लातूर नगरीत स्वागत करण्यात आले. दरम्यान, अडीचशे जणांनी पहिल्या दिवशी प्रवास केला.
पुणे इंटरसिटी ही रेल्वे पुणे येथून सहा वाजून दहा मिनिटांनी निघाली होती. हरंगुळ रेल्वे स्थानकामध्ये तिचे आगमन १२.४० वाजता झाले. तर लातूरहून ३ वा. पुण्याकडे रवाना झाली.
लातूर इंटरसिटीमुळे सोय... इंटरसिटी रेल्वेमुळे लातूर-मुंबई, नांदेड-पनवेल, बीदर-मुंबई या रेल्वेवरील अतिरिक्त ताण कमी होणार आहे. प्रवाशांची गैरसोयही कमी होणार आहे. त्यामुळे ही रेल्वे महत्वाची असल्याचे खासदार सुधाकर शृंगारे यावेळी म्हणाले.
पायलटचे केले स्वागत खासदार सुधाकर शृंगारे यांनी प्रवाशांचे स्वागत केले. तसेच इंटरसिटी रेल्वे घेऊन आलेले पायलट बी.के. घाडगे, सहायक पायलट दत्ता गोरे, प्रशांत जानराव यांचे स्वागत केले. खासदार शृंगारे यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे आभार मानले. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख, शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख ॲड. बळवंत जाधव तसेच गुरुनाथ मगे, गणेश गोमचाळे, तुकाराम गोरे, मीनाताई भोसले उपस्थित होते.