लातूर : ग्रामीण भागातील प्रवाशांची गैरसोय टाळण्याकरिता राज्य परिवहन महामंडळाच्या १६६ बसेस मुक्कामी राहत होत्या. मात्र, कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे मुक्कामी बस रद्द करण्यात आल्या होत्या. कोरोनाचे रुग्ण घटू लागल्याने बससेवा पूर्वपदावर येऊ लागली आहे. मात्र, अद्यापही शंभरावर मुक्कामी बस बंदच आहेत. त्यामुळे प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
रात्री उशिरा ग्रामीण भागात जाणाऱ्या प्रवाशांना गावी पोहचता यावे, यासाठी महामंडळाच्यावतीने मुक्कामी बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. सकाळी लवकर शाळा, कॉलेजला येणारे विद्यार्थी तसेच कामानिमित्त शहरात येणाऱ्या व्यक्तींना मुक्कामी बस फायद्याची ठरते. कोरोनापुर्वी जिल्ह्यातील पाच आगारातून १६६ बसेस मुक्कामी सोडल्या जात होत्या. वाढत्या प्रादुर्भावामुळे मध्यंतरी मुक्कामी बसेस बंद करण्यात आल्या होत्या. आता परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याने ६६ मुक्कामी बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे उर्वरित मुक्कामी बसेस पूर्वीप्रमाणे सुरू करण्याची मागणी प्रवाशांसह विद्यार्थ्यांमधून होत आहे.
आगार आणि मुक्कामी गावी थांबणाऱ्या बसेस...
लातूर - २८ - १५
उदगीर - २८ - ११
अहमदपूर - ३१ - १५
निलंगा - ३१ - १८
औसा १७ - १०
प्रवाशांचा प्रतिसाद वाढला...
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने व्यवहार पूर्वपदावर येत आहेत. त्यामुळे एसटीला प्रवाशांचा प्रतिसाद वाढत आहे.
माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना शहरात यावे लागते. त्यामुळे विद्यार्थी एसटीलाच पसंती देतात.
प्रवासी वाहतूक पूर्ण क्षमतेने होत असून, बसमध्ये मास्क, फिजिकल डिस्टन्स आदी नियमांचे काटेकारेपणे पालन केले जात आहे.
रुग्ण घटले; बस कधी सुरू होणार?
कोरोनापुर्वी गावात नियमित बस मुक्कामी येत होती. कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने बस बंद झाली. आता रुग्णांची संख्या कमी झाली तरी मुक्कामी बस सुरू झालेली नाही. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. एसटी महामंडळाने लवकर मुक्कामी बस सुरु करावी. - सुखलाल यादव
मुक्कामी बस सुरू असल्यामुळे शहरात सकाळी लवकर जाऊन कामकाज करता येत होते. रात्रीही गावात येणे सोयीचे होते. आता बस बंद आहे. त्यामुळे शैक्षणिक कामासाठी बाहेर जाण्यासाठी खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. महामंडळाने मुक्कामी बस सुरू केल्यास गैरसोय दूर होईल. - मधुकर भुरे
प्रतिसादानुसार बसेस सुरू...
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याने बसेस सुरू झाल्या आहेत. ज्या मुक्कामी बसेस सुरू आहेत त्या प्रवाशांचा प्रतिसादानुसार सुरू आहेत. शनिवार, रविवार विकेंड लॉकडाऊन आहे. तसेच ४ नंतर व्यवहार बंद होतात. त्यामुळे प्रवाशांचा प्रतिसादानुसार मुक्कामी बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. ज्या बसेस बंद आहेत त्या लवकरच सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल.- सचिन क्षीरसागर, विभाग नियंत्रक