लातूर : येथील एका व्यापाऱ्याला १०० काेटींचे कर्ज मिळवून देताे, असे आमिष दाखवत कमिशनपाेटी १ काेटी ५२ लाख ५० हजार रुपयांना गंडा घातल्याप्रकरणी अटकेत असलेल्या समीर कादरी ऊर्फ आर. के. रमण (रा. चेन्नई, तामिळनाडू) याला लातूरच्या न्यायालयात गुरुवारी दुपारी हजर केले असता, १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तर अन्य साथीदारांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
पाेलिसांनी सांगितले, फिर्यादी धनराज नरसिंगदास पल्लाेड (४४, रा. मैत्री पार्क, लातूर) यांना व्यापारासाठी १०० काेटी रुपयांच्या कर्जाची गरज हाेती. त्यांना कर्ज उपलब्ध करुन देण्याचे आमिष दाखवून तब्बल १ कोटी ५२ लाख ५० हजार रुपयांना गंडवल्याची घटना घडली होती. दरम्यान, याबाबत गांधी चौक पोलीस ठाण्यात चेन्नई येथील सहाजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासाची चक्र गतिमान करत एकाला गेल्या आठवड्यात चेन्नई शहरातून अटक करण्यात आली. त्याला ५ ऑगस्ट रोजी लातूरच्या न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. बुधवारी आरोपीच्या पोलीस कोठडीचा कालावधी संपल्याने पोलिसांनी गुरुवारी दुपारी त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे, असे लातूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी जितेंद्र जगदाळे यांनी सांगितले.
अन्य साथीदारांचा पथकाकडून शोध सुरु...
गुन्ह्यातील फरार असलेल्या आदित्य राम उर्फ ई हरिप्रसाद, जिन्ना कादरी उर्फ अब्दुल्ला उर्फ सुलतान, नरसिंम्हन रामदाेस उर्फ विनाेथ, व्ही. एम. माेहम्मद दाऊद खान आणि माेहम्मद अली (सर्व रा. चेन्नई, तामिळनाडू) यांच्याही लवकरच मुसक्या आवळल्या जातील, असेही उपविभागीय पोलीस अधिकारी जगदाळे म्हणाले.