जळकोट हे तालुक्याचे ठिकाण असून येथे विविध कार्यक्रमांसाठी छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक सभागृह व मुस्लीम समाजासाठी शादीखाना मंजूर करण्यात यावा, अशी मागणी वारंवार राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्याकडे समाज बांधवांकडून करण्यात येत होती. त्यासाठी लेखी निवेदनही देण्यात आले होते. त्याचा राज्यमंत्री बनसोडे यांनी सहानुभूतीपूर्वक विचार करून नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ही मागणी करीत पाठपुरावा सुरू केला होता.
नव्याने स्थापन केलेल्या नगरपंचायतींना नागरी सुविधा पुरविण्यासाठी राज्य शासनाच्या नगरविकास खात्याने २५ कोटी रुपये राखीव ठेवले आहे. त्या योजनेतून राज्यपालांच्या आदेशाने शासनाचे अवर सचिव विवेक कुंभार यांच्या स्वाक्षरीने हा निधी मंजूर झाल्याचे पत्र २३ सप्टेंबर रोजी निघाले आहे. सांस्कृतिक सभागृह, शादीखान्यासाठी निधी मंजूर झाल्याने राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अर्जुन पाटील आगलावे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मन्मथप्पा किडे, नगरसेवक शिवानंद देशमुख, खाटिक महासंघाचे अध्यक्ष खादरभाई लाटवाले, मुस्लीम कमिटीचे सदर मैनुद्दीन लाटवाले, मुमताज शेख, अजिज मोमीन, दिगंबर भोसले, शहराध्यक्ष अशोक डांगे, श्याम डांगे, दस्तगीर शेख, नगरसेवक महेश धुळशेट्टे, ख्वाजाभाई मोमीन, बिस्मिल्ला बेग, इस्माईल कोतवाल, माजी नगराध्यक्ष उस्मान मोमीन आदींनी समाधान व्यक्त केले.
जळकोटातील दोन्ही सभागृहासाठी तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याने आनंद व्यक्त होत आहे. या कामाची लवकरच टेंडर प्रक्रिया पूर्ण होऊन कामास सुरुवात होर्ईल, असे राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.