राजकुमार जाेंधळे, उदगीर (जि. लातूर) : चाेरीला गेल्या आठ दुचाकींसह एका आराेपीच्या मुसक्या पाेलिस पथकाने साेमवारी आवळल्या. याबाबत उदगीर शहर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले की, उदगीर शहरातील एका मंगल कार्यालयानजीक फर्निचर दुकानासमाेर पार्किंग करण्यात आलेली दुचाकी (एम.एच. २४ ए.डी. ५०४९) १० मे २०२४ रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास अज्ञातांनी पळविली. याबाबत उदगीर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता, गुन्ह्याची अधिक माहिती मिळाली. सीसीटीव्हीत कैद झालेल्या चाेरट्याची खबऱ्याकडून ओळख पटविण्यात आली. आराेपी हा जळकाेट तालुक्यातील घोणसी येथील असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे विनोद विलास भागावे (वय ३४) याला पाेलिसांनी ताब्यात घेत कसून चाैकशी केली. त्याने दुचाकी चाेरल्याची कबुली दिली. अटक करण्यात आल्यानंतर त्याच्याकडून विविध गुन्ह्यांतील आठ दुचाकी जप्त केल्या आहेत. यातील दाेन दुचाकी या उदगीर शहर आणि उदगीर ग्रामीण ठाण्याच्या हद्दीतून चाेरण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले, तर इतर दुचाकीचे इंजिन, चेसीसच्या क्रमांकावरून शोध घेण्यात येत असल्याचे पाेलिसांनी सांगितले.
ही कारवाई पाेलिस अधीक्षक सोमय मुंडे, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे, उदगीर उपविभागीय पोलिस अधिकारी सोहेल शेख यांच्या मार्गदर्शनाखाली उदगीर शहर ठाण्याचे पोलिस निरीक्षक करण सोनकवडे, स्थानिक गुन्हे शाखेचे गजानन पुल्लेवाड, संदीप साठे, दीपक कच्छवे, ईश्वर बिरादार, बबन टारपे यांच्या पथकाने केली.