लातूर : शहरासह चाकूर येथून चारलेल्या चार दुचाकींसह एकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी अटक केली आहे. याबाबत चाकूर, लातूर जिल्ह्यातील विविध पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
पाेलिसांनी सांगितले, जिल्हा पाेलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी दुचाकी चाेरीतील गुन्हेगारांना अटक करण्याचे आदेश दिले हाेते. त्यानुसार लातूरसह जिल्ह्यातील विविध पाेलिस ठाण्यांच्या रेकाॅर्डवर असलेल्या दुचाकी चाेरांचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून शाेध घेतला जात हाेता. दरम्यान, माहिती संकलित करताना घारोळा येथे थांबलेला तरुण दुचाकी विक्री करण्याच्या प्रयत्नात आहे, अशी माहिती खबऱ्याने दिली. या माहितीच्या आधारे घारोळा येथे तातडीने पाेलिस पथक दाखल झाले.
एका घरासमोर दुचाकीसह थांबलेल्या तरुणाला विश्वासात घेत ताब्यात घेतले. त्याने उद्धव पांडुरंग सूर्यवंशी (२३, रा. घारोळा ता. चाकूर) असे आपले नाव सांगितले. त्यांच्याकडील दुचाकीबाबत चाैकशी केली असता, २०२३ मध्ये चाकुरातील एका रुग्णालयासमाेर थांबविलेली दुचाकी चाेरल्याचे सांगितले. शिवाय, लातूर जिल्ह्यातील विविध पाेलिस ठाण्यांच्या हद्दीतून इतर तीन दुचाकी चाेरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून एकूण चार दुचाकी जप्त केल्या आहेत.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण राठोड, पाेलिस अंमलदार सुधीर कोळसुरे, सिद्धेश्वर जाधव, राजेश कंचे, प्रकाश भोसले, मोहन सुरवसे, योगेश गायकवाड, चालक चंद्रकांत केंद्रे यांच्या पथकाने केली.