लातूर : गावठी कट्ट्यासह एका अल्पवयीन मुलाला पाेलिसांनी ताब्यात घेतल्याची घटना लातुरातील सीतारामनगर येथे घडली. याबाबत शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात दाेघांविराेधात साेमवारी गुन्हा दाखल केला आहे.
पाेलिसांनी सांगितले, पाेलिस उपनिरीक्षक हनुमंत कवले (वय ३८) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, लातूर शहरातील सीतारामनगर येथे भाड्याने वास्तव्याला असलेल्या बीड जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलाने देशी कट्टा (रिव्हॉल्व्हर) खाेलीत ठेवल्याची माहिती खबऱ्याने पाेलिसांना दिली. माहितीची खातरजमा केल्यानंतर पाेलिसांनी खाेलीवर भेट देऊन पाहणी केली असता, देशी कट्टा आढळून आला. याबाबत अधिक चाैकशी केली असता, ताे देशी कट्टा गणेश शेंडगे (वय ३०, रा. एलआयसी काॅलनी, लातूर) याचा असून, त्याने ताे माझ्याकडे ठेवण्यासाठी दिला होता, असे सांगितले.
याबाबत शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून एका अल्पवयीन मुलासह गणेश शेंडगे याच्याविराेधात गुन्हा दाखल केला आहे. तपास सपाेनि चव्हाण करीत आहेत. ही कारवाई पाेलिस निरीक्षक दिलीप सागर, पाेलिस उपनिरीक्षक हनुमंत कवले, बालाजी कोतवाड, शिंदे, पांगळ यांच्या पथकाने केली.