ऑनलाइन लोकमत
लातूर, दि.10 - शहरातील सिग्नल कॅम्प परिसरात असलेल्या उड्डाण पुलाशेजारी थांबलेल्या भीमराव विश्वनाथ चव्हाण (३२, रा. विळेगाव, ता. देवणी) याला शिवाजीनगर पोलिसांनी मंगळवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास १८ किलो ४०० ग्रॅम गांजासह अटक केली आहे. या प्रकरणी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देवणी तालुक्यातील विळेगाव येथील भीमराव विश्वनाथ चव्हाण हा लातुरातील काही गांजा विक्री करणाºया लोकांना गांजा देण्यासाठी मंगळवारी पहाटे आला होता. तो शहरातील सिग्नल कॅम्प परिसरात असलेल्या उड्डाण पुलाशेजारी एकटाच थांबला होता. त्याच्याजवळ १८ किलो ४०० ग्रॅम गांजा असलेले पोते आढळून आले. याबाबतची माहिती शिवाजीनगर पोलिसांना खबºयामार्फत मिळाली. या माहितीच्या आधारे शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पन्हाळकर हे आपल्या पथकासह सिग्नल कॅम्प परिसरात दाखल झाले. पोलिसांना पाहिल्यानंतर भीमराव चव्हाण हा गोंधळून गेला. दरम्यान, याची चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली. यातून पोलिसांचा संशय अधिक बळावला आणि त्यांनी त्याच्याकडील मुद्देमालाची तपासणी केली असता १८ किलो ४०० ग्रॅम गांजा आढळून आला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर त्याची अधिक चौकशी करून त्याच्या विरोधात दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोउनि. पन्हाळकर हे करीत आहेत.
कर्नाटकातून लातुरात गांजा...
लातुरात काही पानटपरीवर गांजा सर्रास विक्री होत असून, ठराविक लोकांना हे टपरीचालक गांजाच्या पुड्या देतात. हा गांजा प्रामुख्याने कर्नाटक, तेलंगणातून येत असल्याचे पुढे आले आहे. देवणी तालुक्यातील विळेगाव येथून भीमराव चव्हाण हा लातुरात काही ठराविक विक्रेत्यांना गांजा पुरवठा करण्यासाठी आला होता. त्याला शिवाजीनगर पोलिसांनी पहाटेच्या वेळी अटक केली.