लातूर : जिवंत काडतूस, गावठ्ठी कट्टा, चाेरीच्या पाच दुचाकींसह एकाला एमआयडीसी ठाण्याच्या पाेलिस पथकाने शुक्रवारी अटक केली. त्याच्याकडून २ लाख ९६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत एमआयडीसी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, लातुरात गुरुवारी मध्यरात्री बांभरी चौक, रिंगरोड येथे एक जण गावठी कट्टा विक्री करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती खबऱ्याने एमआयडीसी पाेलिसांना दिली. या माहितीच्या आधारे पाेलिसांनी सापळा लावून अरुण रणजीतसिंह जमादार (वय २२, रा. शिवणखेड खु., ता. अहमदपूर) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून गावठी कट्टा (पिस्टल), एक जिवंत काडतूस, दुचाकी जप्त केली आहे. याबाबत एमआयडीसी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक चाैकशी केली असता, त्याच्याकडून चाेरीतील पाच दुचाकी जप्त केल्या आहेत. या दुचाकी चोरीच्या गुन्ह्यातील असल्याचे समोर आले आहे. या दुचाकी शिवाजीनगर ठाणे, रेणापूर ठाण्याच्या हद्दीतून चाेरल्याचे सांगण्यात आले. चाेरीच्या तीन गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे, डीवायएसपी भागवत फुंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गोरख दिवे, सपोनि. माणिक डोके, सपोउप. भीमराव बेल्हाळे, अर्जुन राजपूत, मयूर मुगळे, सचिन कांबळे, बळवंत भोसले, लोंढे, योगेश चिंचोलीकर यांच्या पथकाने केली.