उदगीर : शहरालगत असलेल्या सोमनाथपूर येथील एका इसमाने व्याजाच्या पैशाच्या तगाद्याला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी प्रारंभी आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात करण्यात आली होती. मात्र, मयताच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून शुक्रवारी रात्री पाच जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एकाला अटकही झाली आहे.शहराच्या जवळ असलेल्या सोमनाथपूर भागातील रहिवासी विजय शिवाजी गोविंदवाड यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय होता. यासाठी त्यांनी काही जणांसोबत पैशाचा देवाण-घेवाणचा व्यवहार केला होता. या व्यवहारात घेतलेल्या पैशाच्या व्याजासाठी सतत तगादा चालू होता. सततच्या होणाऱ्या त्रासाला कंटाळून विजय गोविंदवाड यांनी बुधवारी सकाळी स्वतःच्या घरी आत्महत्या केली.
प्रारंभी ग्रामीण पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली होती, परंतु शुक्रवारी मयताची पत्नी लक्ष्मीबाई विजय गोविंदवाड (रा.सोमनाथपूर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून परमेश्वर रामचंद्र बिजराळे (रा.डोंगरशेळकी), रेश्मा जुनेद पठाण, जुनेद जाफर पठाण, जाफर पठाण व तम्मा सजनशेट्टे (सर्व जण रा.उदगीर) यांनी संगनमत करून फिर्यादीचे पतीस जीवे मारण्याची धमकी देऊन व्याजाचे पैसे वसुलीसाठी सतत त्रास देऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याची तक्रार दिल्यावरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी तम्मा सजनशेट्टे यास पोलिसांनी अटक केली आहे.