वलांडी : कोरोनाच्या दोन्ही लाटांवर आपण मात केली असली तरी तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे आरोग्य प्रशासनाकडून आवश्यक ती तयारी करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत संपूर्ण तालुक्यात लसीकरण झाले पाहिजे, असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले.
धनेगाव येथील मांजरा नदी काठावरील महादेव मंदिरात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष काशिनाथ गरिबे, पंचायत समिती सभापती सविता पाटील, भगवान पाटील तळेगावकर, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, उपसभापती शंकरराव पाटील, चेअरमन दगडू सोळुंके, प्रशांत पाटील जवळगेकर, तुकाराम पाटील, सभापती बालाजी बिरादार, प्रशांत पाटील दवणहिप्परगेकर, सुधीर भोसले, रामलिंग शेरे आदी उपस्थित होते.
धनेगाव येथे राबविण्यात येत असलेल्या महत्त्वाकांक्षी योजनांची माहिती उपसरपंच कुमार पाटील व ग्रामसेवक श्रीकांत पताळे यांनी दिली. यावेळी तहसीलदार सुरेश घोळवे व गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी १ लाख १० हजार वृक्ष लागवड झाल्याची माहिती दिली. गावात आता वृक्ष लागवड, बाला उपक्रमाला प्रोत्साहन देण्याबरोबर आरोग्याची काळजी घेण्यासाठी उपाययोजना राबविण्याकडे ग्रामस्तरावर लक्ष केंद्रीत करावे, असेही माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर म्हणाले.