लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : जिल्ह्यात आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराच्या माध्यमातून कृषिवन आणि सार्वजनिक वन विकासासाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली जात आहे. आर्ट ऑफ लिव्हिंग आणि ओव्हरसीस व्हाॅलिंटर्स फॉर बेटर इंडिया संस्थेच्यावतीने एक लाख वृक्ष लागवडीच्या यंदाच्या उपक्रमाला जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या हस्ते लातूर तालुक्यातील नागझरी येथे प्रारंभ झाला़.
जिल्ह्यातील सर्व शासकीय कर्मचारी आणि नागरिकांना सहभागी करून वृक्ष संवर्धन चळवळ गतिमान करण्याचा मानस व्यक्त केला आहे. नागझरी आणि इंद्रठाणा येथील वृक्ष लागवड प्रकल्पांची पाहणी करण्यात आली. मांजरासह इतर नद्यांच्या पुनरूज्जीवन प्रकल्पांची माहिती घेऊन नदीकाठी बांबू लागवड करण्याची सूचना केली आहे. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या परिवाराने मागील चार वर्षांत मांजरा नदीकाठी तीन गावांत ४५ एकर जमिनीवर नियोजनबद्ध पद्धतीने ठिबक सिंचनचा वापर करून विस्तीर्ण जंगल तयार केले आहे. कमी, मध्यम व दीर्घ कालावधीची वृक्ष लागवड केली असून, विविध फळझाडे आाणि फुलांची झाडे लावली. यामुळे पशुपक्ष्यांना अन्नही मिळेल, जंगलातील जीवचक्र चालू राहील. राज्यात सर्वात कमी वनक्षेत्र लातूर जिल्ह्यात असून, ते एक टक्क्यांपेक्षाही कमी आहे. आर्ट ऑफ लिव्हिंग, सामाजिक संस्थेच्या माध्यमातून येत्या पाच वर्षांत क्षेत्र पाच टक्क्यांपर्यंत वाढविण्याचे काम हाती घेतले आहे. गत ९ वर्षांत १००पेक्षा जास्त गावांत जनजागृती अभियानाच्या माध्यमातून नदी-पुनरुज्जीवन आणि पाणलोट क्षेत्र विकासाची कामे करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील वनक्षेत्र वाढून शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न मिळण्यासाठी कोरडवाहू आणि कमी पाण्यावर येणाऱ्या फळबागांचे नियोजन करून मोठ्या प्रमाणात वृक्षांची लागवड करण्यात येत असल्याचे आर्ट ऑफ लिव्हिंगचे महादेव गोमारे म्हणाले.
यावेळी नागझरीचे सरपंच श्रीराम साळुंखे, ज्ञानेश्वर पवार, श्रीराम पवार, भारत काळे, डॉ. वसुंधरा गुडे, शोभा गायकवाड, संजय गायकवाड, रोहित सर्वदे, नामदेव शिंदे, अंकुश गवळी उपस्थित हाेते.
फोटो ओळी : लातूर तालुक्यातील नागझरी येथे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.