राजकुमार जाेंधळे / लातूर : दुचाकी पळविणाऱ्या टाेळीतील एका चाेरट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून, त्याच्याकडून चाेरीतील दाेन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
लातूर शहरासह जिल्ह्यातील विविध पाेलिस ठाण्यांच्या हद्दीत अलिकडे वाहन चाेरीच्या घटनात माेठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. यातील आराेपींच्या अटकेसाठी, गुन्ह्याच्या तपासासाठी जिल्हा पाेलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी आदेश दिले हाेते. दरम्यान, अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या पथकाने लातूरसह जिल्ह्यातील विविध पाेलिस ठाण्यात घडलेल्या गुन्ह्यांची माहिती संकलित केली. रेकाॅर्डवरील गुन्हेगारांचा शाेध घेतला. यासाठी विशेष पथक स्थापन करण्यात आले. चाेरीतील दुचाकी विक्रीसाठी सराई चाेरटा मांजरा रेल्वे गेट परिसरात फिरत असल्याची माहिती खबऱ्याने पाेलिसांना दिली.
या माहितीच्या आधारे पथकाने मांजरा रेल्वे गेट परिसरात धाव घेत दुचाकीसह एकाला ताब्यात घेतले. त्याची झाडाझडती घेत अधिक चाैकशी केली असता, प्रथमेश महादेव पांचाळ (वय १८, रा. येरोळ हमु. लातूर) असे त्याने नाव सांगितले. काही महिन्यापूर्वी लातुरात प्रकाशनगर आणि अन्य एका परिसरातून दुचाकींची चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून दाेन दुचाकी जप्त केल्या असून, एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई लातूर स्थागुशाचे सिद्धेश्वर जाधव, सुधीर कोळसुरे, राजेश कंचे, चंद्रकांत केंद्रे यांच्या पथकाने केली.