लातूर : महिलांचे आरोग्य, पोषण व आर्थिक स्वावलंबनासाठी राज्य शासनाच्या वतीने मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजना सुरु करण्यात येत आहे. त्याअंतर्गत राज्यातील महिलांच्या खात्यावर मासिक दीड हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत. त्यासाठी सोमवारपासून ऑनलाईन प्रस्ताव सादर करण्यास सुरुवात होत आहे.
राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी- सुविधा उपलब्ध करुन रोजगार निर्मितीस चालना देणे. त्यांचे आर्थिक व सामाजिक पुनर्वसन करुन त्यांना स्वावलंबी व आत्मनिर्भर बनविणे. तसेच महिला व मुलींना सशक्तीकरणास चालना मिळावी आणि महिला व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य व पोषण स्थितीत सुधारणा व्हावी म्हणून राज्य शासनाने १ जुलैपासून मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजना हाती घेतली आहे.
लाभासाठी पात्रता...लाभार्थी महिला ही महाराष्ट्रातील रहिवाशी असावी. किमान वय २१ पूर्ण आणि कमाल वय ६० वर्षे असावे. ती विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या, निराधार असावी. योजनेच्या लाभासाठी बँक खाते असावे. लाभार्थीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे.
लाभासाठी आठ कागदपत्रे हवी...योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करावा. आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र अथवा जन्म दाखला, वार्षिक अडीच लाखापर्यंतचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र, बँक खात्याच्या पासबुकाची पहिल्या पानाची झेरॉक्स, पासपोर्ट फोटो, रेशनकार्ड, योजनेच्या अटी, शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र.
ऑनलाईन करता येईल अर्ज...मोबाईल ॲप, अंगणवाडी, ग्रामपंचायत, सेतू सुविधा केंद्रातून ऑनलाईन अर्ज करता येईल. त्यानंतर पोच पावती मिळेल. अर्जदार महिलेने स्वत: उपस्थित राहणे आवश्यक आहे. जेणेकरुन तिचा फोटो काढून ई- केवायसी करता येईल. यावेळी रेशनकार्ड, स्वत:चे आधारकार्ड सोबत ठेवणे बंधनकारक आहे.
१५ जुलैपर्यंत मुदत...योजनेच्या लाभासाठी १ जुलैपासून अर्ज दाखल करता येईल. १५ जुलैपर्यंत मुदत आहे. १६ रोजी तात्पुरती यादी प्रकाशित होईल. त्यावर २० पर्यंत तक्रार, हरकती नोंदविता येतील. २१ ते ३० जुलैदरम्यान तक्रार, हरकतींचे निराकरण होईल. अंतिम यादी १ ऑगस्ट रोजी प्रसिध्द होईल.
लाभासाठी प्रस्ताव दाखल करावा...पात्र महिलांनी मोबाईल ॲप, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत, सेतू सुविधा केंद्रातून मुदतीत ऑनलाईन अर्ज करावा. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी.- जावेद शेख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालकल्याण.